कोरोना लसीला घाबरून गावकऱ्यांनी घेतल्या नदीत उड्या, १५०० पैकी १४ जणांनीच घेतली लस


 कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी कोरोना लसच महत्त्वाचं शस्त्र आहे. सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, अजूनही लोक लस घेण्यासाठी धजावत नसल्याचे दिसते. 

सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात लसीबाबत विविध गैरसमज आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी लस देण्यासाठी एका गावात गेले असता, गावकऱ्यांनी चक्क नदीत उड्या घेतल्याचे समोर आले आहे.  

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील सिसौडा गावात ही घटना घडली. १५०० लोकसंख्येचे हे छोटेसे गाव. कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाची 'टीम' या गावात गेली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत सूचना करताच, गावकरी गावाबाहेरुन वाहणाऱ्या सरयू नदीकाठी जाऊन बसले. आरोग्य विभागाचे कर्मचारी नदीकाठी गेले असता, त्यांना पाहून काहींनी तेथून पळ काढला, तर काहींनी आपल्या जीवाची पर्वा न करता, चक्क सरयू नदीत उड्या घेतल्या.

उपजिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र गावकरी कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही. १५०० पैकी अखेर १४ लोकांनीच लस घेतली.

Post a Comment

0 Comments