मुंबई : देशात कोरोना संकट वाढत असतानाच केरळ, पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणूक पार पडल्या होत्या. यानंतर, आज मतमोजणी पार पडत असून निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे दिग्गज नेते मैदानात उतरले होते.
दरम्यान, आता निकाल जाहीर होत असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी कडवी लढत दिली आहे. यामुळे भाजपने मागील निवडणुकांपेक्षा मोठी मुसंडी मारली असली तरी दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. तर, आतापर्यंत तृणमूल काँग्रेसने २०० हुन अधिक जागांवर विजय मिळवला असून पक्ष २२३ हुन अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
अशातच, भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ममतादीदींच्या विजयासाठी अदृश्य हात काम करत होते, असा दावा केला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडले. त्यामुळे मतविभागणी रोखली गेली. आणि त्याचा फटका भाजपला बसला. एकप्रकारे त्यांचे अदृश्य हात ममता बॅनर्जींच्या मदतीसाठी काम करत होते.’ असं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. ‘प.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..! “शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.” याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता..!’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
0 Comments