पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवर अक्षेप घेण्यात आला आहे. मतमोजणीमध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने, मतमोजणी परत घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैलाजा गोडसे, सिद्धेश्वर अवताडे तसेच राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे समाधान आवताडे हे विजयी झाले आहेत, त्यांनी महाविकास आघडीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला.
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना २ लाख १३ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. मात्र उर्वरित १७ उमेदवारांना केवळ १२ हजार मते मिळाली. त्यामुळे विरोधकांनी आता या मतमोजणीवर अक्षेप घेतला आहे. मतमोजणीनंतर आम्हाला अनेक नागरिकांचे फोन येत आहेत. त्यांच्याकडून मतमोजणीबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आम्ही फेर मतमोजणीची मागणी करत आहोत असं सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा परभाव करत समाधान आवताडे यांनी ३७३६ मतांनी विजय मिळवला होता. मात्र त्यावेळी देखील उर्वरित उमेदवारांकडून मतमोजणीबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आले होते, परंतु पत्राची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप संबंधित उमेदवारांनी केला आहे.
पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर येथील स्वेरी कॉलेजचे सॉफ्टवेअर वापरण्यात आले होते. त्या कॉलेजचे सचिव हे भारतीय जनता पार्टीचे एका सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने त्याच महाविद्यालयातील सॉफ्टवेअरचा उपयोग केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून विरोधकांना संपवण्याचा डाव शांत डोक्याने तयार करण्यात आल्याचा आरोप देखील सचिन पाटील यांनी केला आहे. तर इतर कॉलेजचे सॉफ्टवेअर घेता येत असताना त्याच कॉलेजचे सॉफ्टवेअर का घ्यावे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप मांडवे यांनी उपस्थित केला आहे.
0 Comments