गाव तिथं कोविड केअर सेंटर – सोलापूर जिल्ह्याची संकल्पना ; सर्वप्रथम बार्शी तालुक्याने पुढाकार घेतलेली संकल्पना महाराष्ट्रासाठी ठरतेय नवसंजीवनी


सोलापूर/प्रतिनिधी:

कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या सामान्य रूग्णालाही बेड उपलब्ध होत नसल्याचं वास्तव आहे. कोरोनाच्या सामान्य रूग्णांपासून इतरांना बाधा होऊ नये, गावातल्या गावात रूग्णांना उपचार मिळून रूग्ण त्वरित बरा व्हावा, यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून ‘गाव तिथं कोविड केअर सेंटर’ उभे राहत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नव्याने १०० कोविड केअर सेंटर उभा राहत असून सद्यस्थितीत या संकल्पनेतून ६९ कोविड केअर सेंटर सुरू झाली आहेत.

 जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या संकल्पनेला प्रत्यक्षात आणायला सुरूवात केली आहे. पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर तयार करण्यात येत आहेत. ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथं मंगल कार्यालय किंवा शाळांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, खाजगी डॉक्टरांची मदत घेऊन कोविड सेंटरमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 श्री. स्वामी यांनी जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून संकल्पनेची माहिती दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मंगल कार्यालय, सभागृह हॉल किंवा शाळा निश्चित करून पाहणी करावी. याठिकाणी शौचालय, बाथरूम आणि पाण्याची व्यवस्था पहावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विजेची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना दाखल करण्यात येत आहे. रूग्णांना लक्षणे गंभीर असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्या रूग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत आहे.

 कोविड सेंटरसाठी आरोग्य कर्मचारी, गावातील खाजगी डॉक्टरांच्या सेवा घेण्यात येत आहेत. त्यांना विनंती करून त्यांच्या सेवेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. रूग्णांना लागणारी औषधे ही जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येत असून इतर साहित्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सदस्य यांनी योगदान देण्याचे आवाहन श्री. स्वामी यांनी केले आहे.

 जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय, तीन उपजिल्हा रूग्णालये, १४ ग्रामीण रूग्णालये, ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि याअंतर्गत ४३१ उपकेंद्र रूग्णांना सेवा देत आहेत. याचबरोबर १४  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सहा आयुर्वेदिक दवाखाने आहेत. ग्रामीण भागात ७७  प्राथमिक आरोग्य केंद्रांसोबत अन्य ३३ ठिकाणी नव्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून ६० ठिकाणी ती कार्यरत झाली आहेत. प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये २५ ते ५० बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

 तालुकानिहाय कोविड केअर सेंटर- अक्कलकोट-०६, बार्शी-०५, करमाळा-०५, माढा-०९, मोहोळ-०८, मंगळवेढा-०३,माळशिरस-१९, पंढरपूर-२१, सांगोला-१०, दक्षिण सोलापूर-०९आणि उत्तर सोलापूर-०५.

 बार्शी तालुक्याने पहिल्यांदा पुढाकार घेऊन नऊ ठिकाणी सेंटर सुरू केली आहेत. नकाते मंगल कार्यालय, वैराग (बेड क्षमता ५०), साई आयुर्वेद महाविद्यालय, सासुरे, वैराग (१००), लोकसेवा विद्यालय, आगळगाव (५०), दत्त मंगल कार्यालय, खांडवी (५०), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, चिखर्डे (५०), जिल्हा परिषद शाळा, पांगरी (५०), संत तुकाराम विद्यालय, पानगाव (५०), जिल्हा परिषद शाळा, गौडगाव (५०) आणि जिल्हा परिषद शाळा, उपळे दुमाला (५०) अशी एकूण ५०० बेडची क्षमता कोविड केअर सेंटरमध्ये निर्माण केली आहे.

 

कोविड सेंटरचा फायदा

इतरांना संसर्ग होणार नाही.

गावातच सोय झाल्याने घरचे जेवण मिळेल.

रूग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील.

जाण्या-येण्याचा खर्च, वेळ वाचेल.

 

गावकऱ्यांची गावातच सोय

कोविड झाला म्हटलं की रूग्ण निम्मा घाबरून जातो. मोठ्या शहरातील दवाखान्यात जाण्यास गावातील रूग्ण घाबरतात. दवाखान्याची सोय गावातच होणार असल्याने चाचणी करून घेण्याचे प्रमाण वाढून रूग्ण आजार अंगावर काढणार नाहीत. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. गावातील सरपंच, खाजगी डॉक्टरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून याचा कोविड सेंटरसाठी फायदा होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

 कोविड रूग्णांना हवा आधार

रूग्णांनी घाबरून न जाता, कोणताही आजार अंगावर न काढता कोरोनाची तपासणी करून घ्यावी. आपण पॉजिटिव्ह आलोय हे समजल्यानंतर किमान १५ दिवस कोणाच्या संपर्कात येऊ नये. अंगावर आजार काढल्यास ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लागण्याची शक्यता असते. कोरोना हा आजार वेळेत उपचार, आहार आणि विश्रांती घेतल्यास निश्चित बरा होत असल्याचे दक्षिण सोलापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड यांनी सांगितले.

 

-धोंडिराम अर्जुन, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

Post a Comment

0 Comments