मंगळवेढा/प्रतिनिधी:
प्रशिक्षणाचे मानधन मिळवून देण्यासाठी महिलेकडून १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील सरपंच आप्पासाहेब येसप्पा पाटील (वय ५७), ग्रामसेवक श्रीकांत मधुकर ठेंगील (वय ३८) व खासगी व्यक्ती अरबाज अखिल शेख (वय २१) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एकाव्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली होती. त्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी धर्मगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगाकडून गावातील बचतगटाच्या महिलांसाठी ३० दिवसांचे प्रशिक्षण दिले होते.
यासाठी मानधन म्हणून त्यांना ९६ हजार रुपये मंजूर झाले होते. ते पैसे मंजूर करण्यासाठी तिघांनी मिळून २५ हजारांची लाच मागितली होती, मात्र दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी सोलापुर येथील रामलाल चौकात लाच घेताना ग्रामसेवक, सरपंच आणि शेख तिघांना पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिली आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्यासह हवालदार सायबण्णा कोळी, पोलिसात शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी, श्रीराम घुगे, कोष्टी, प्रफुल जानराव, स्वप्नील सन्नके, श्याम सुरवसे या पथकाने केली.
0 Comments