चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला ; संजय राऊत यांचे टिकास्त्र


मुंबई/प्रतिनिधी : 

‘देशात अगदी उद्या निवडणूक झाली, तरी मोदी सरकार ४०० जागा जिंकेल’, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होते. या विधानाचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे, याचं मला कौतुक वाटतं. त्यामुळे भाजपाला ४०० काय अगदी ५०० जागाही मिळू शकतात. एवढंच काय ते जगभरातील संसदेच्या सर्व जागा जिंकू शकतात. सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा करोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचे आहे”, असं म्हणत शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात पाहणी दौऱ्यावरुन उपहासात्मक टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाचा सामना करण्यास समर्थ आहेत, याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली असेल आणि ज्याठिकाणी जास्त नुकसान झालं, पण कमजोर सरकार आहे. अशा ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतील, त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं नाही. त्यामुळेच मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत,” असा चिमटा राऊत यांनी मोदींना काढला.

Post a Comment

0 Comments