राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल १ कोटींचा मद्यसाठा जप्त...


देशभरात कोरोनाचा संसर्ग असताना परराज्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने  गोव्यातून मुंबईत  येणाऱ्या ट्रकवर कारवाई करत तब्बल १ कोटींहून अधिकचा मद्यसाठा जप्त  केला आहे. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर किनारा ढाबा, पनवेल येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई केली आहे.

 
 गोव्यात तयार करण्यात आलेली आणि विक्रीसाठी  असलेले मद्य महाराष्ट्रात आणण्यात येत होते. यामध्ये रॉयल चॅलेंज, ऑफिसर चॉईस ब्ल्यू व्हिस्की आणि ओल्ड मंक रमचे १८० मिली तसेच ७५० मिली क्षमतेचे एकूण ५०० बॉक्स वाहनासह जप्त करण्यात आले आहेत. या सर्वांची एकूण किंमत  ५६,५०,५००रुपये इतकी आहे. या प्रकरणी ट्रक चालक शिंकू विरेंद्रकुमार मिश्रा वय वर्षे ४२ आणि क्लिनर शैलेश अच्युतन पद्यावती वय ३९ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या आणखी एका कारवाईत उस्मानाबाद येथे सापळा रचून एका टाटा कंपनीच्या दहा चाकी मालवाहक ट्रकमधून गोव्यात निर्मिती आणि विक्रीसाठी असलेला साठा जप्त करण्यात आला आहे. या सर्वांची एकूण किंमत ४३,९३,००० रुपये इतकी आहे. या प्रकरणी महेश हरेसिंग अजनारे आणि ट्रक क्लिनर काना राधेशाम चारल यांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्काचे मनोज चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 राज्य उत्पादन शुल्काने केलेल्या या दोन्ही कारवाईत एकूण १००,४३,५०० इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे ज्या गोव्यात कोरोनाचा संसर्ग (Infection) उच्चांकावर होता त्याच ठिकाणाहून हा सर्व मद्यसाठा आणण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संताजी लाड, निरीक्षक मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, दिलीब काळेल, प्रशांत निकाळजे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Post a Comment

0 Comments