कृपया आपण प्रत्येकाने यावर विचार करा हा लेख प्रत्येक माणसापर्यत पोचवा ....कोरोना जाईल पण गांवगाडा जगला पाहिजेत.....
संकट जगण्यावर आलं की ध्येय ठीसुळ होतात. नजर स्थिरावते आणि माणूस अंतर्मुख होतो. बाहेरचं वास्तव आत शांतता भरत जातं. नेमका कुणा-कुणाला मदतीसाठी हात द्यावा काही कळत नाही. मदतीसाठी पुढे सरकलेला हात पुन्हा माघारी फिरकेल की नाही ,सांगता येत नाही. हॉस्पिटलच्या पायरीची भिती तर राजरोस गावामध्ये हिंडत असते. माणसं बिथरलेत. कधी नाही तितकं स्वत:ला आतून बाहेरून निरखून बघायलेत. आपलं काय होईल, कसं होईल, हे सगळं कोणत्या वळणाला जाईल असे अनेक टोकदार प्रश्न त्यांच्या मनात आहेत . माझ्या नंतर काय होईल याही भाबड्या प्रश्नानं ते ग्रस्त आहेत. त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे अरे बाबा, तुझ्यानंतर कसं हे बघायला निसर्ग आहे. तू तुझ्या आयुष्यावर लक्ष ठेव. त्याला समजून घे. ही लढाई कोणाची कोणासोबत नाही ती स्वत:ची स्वत:सोबत आहे. त्यामुळं आपण दुनियेच्या किती सोबत आहोत यापेक्षा आपण आपल्यासोबत किती आहोत हे जास्त महत्वाचं. लक्षात घ्या, लाट जितक्या वेगाने येते तितक्या वेगाने जाते सुद्धा. हेही दिवस सरतील. फक्त आपण टिकलो पाहिजे. टिकणं म्हणजे आपण नैसर्गिक बदल समजून घेणं आणि त्याच्याशी स्वत:ला जुळवून घेणं. कारण टिकणं म्हणजे मूग गिळून गप्प राहणे नाही तर बदलासाठी स्वत:ला तयार करणं.
आजची परिस्थिति कोरोना आधीच्या जगाशी जोडू नका. ते जग वेगळं होतं. तो काळ पाठीमागं पडलाय आता. या कोरोनानंतरच्या जगात जगण्याची नवी रीत समजून घ्यावी लागेल. कोरोनाला सोबत घेवूण जगणं ही कोरोनानंतरच्या नव्या जगाची अट असेल तर आपल्याला ती मान्य करण्याच्या दिशेने पावल टाकावी लागतील.
सध्याची अवस्था बघता, आज पेशंट गावातून बाहेर पडत नाहीत. लक्षणं असून सुद्धा अंगावर काढतात आणि नंतर अवस्था गंभीर झाल्यावर धावपळ करावी लागते त्यावेळी मार्ग खूप कमी असतात. ही गावगाड्याची अडचण समजून घेवूण काहीतरी उपाययोना कराव्या लागतील. नेत्यांची वाट बघत थांबलो तर गावं नामशेष होतील. निवडणूक झाल्यानंतर नेते सापडणे कठीण असते. देशात जिथं-जिथं निवडणूका झाल्या तिथं-तिथं मरणाचा टक्का वाढला. प्रचार फक्त कोरोनाचा झाला आणि निकाल लागला तेंव्हा सामान्य माणसाचे हात रक्ताने माखले आणि नेत्यांचे गुलालाने. गुलाल हे विजायचं प्रतीक असलं तरी आजच्या घडीला पराभवाचं संचित आहे. निवडणुकीतल्या शक्तिप्रदर्शनासाठी नेत्यांनी सामान्य माणसाचे हातात-हात घेतले होते. आज सामन्यांच्या आयुष्याचा थरकाप उडाल्यावर जर ते हात झटकत असतील तर या वृत्तीची झडती घेण्याची वेळ नक्की येईल. पण आता काय आपण करू शकतो याचा विचार करणं जास्त गरजेचं. गाव असं नेत्यांच्या नावे खंडून देवून चालणार नाही.
गावानं गावासाठी कंबर कसली पाहिजे. प्रत्येक गावातील एक -दोन डॉक्टर, आशा, परिचारिका (असतील तर) व स्वयंसेवक यांना विश्वासात घेवून पाच-सहा बेडच ‘गाव कोविड सेंटर’ उभा केलं पाहिजे. हे थोड्या कमी सुविधांचं असेल पण अधिक धीर देणार असेल. याचा फायदा हा होईल की प्राथमिक अवस्थेतील रुग्ण घर सोडतील. डॉक्टरांच्या मदतीने प्राथमिक अवस्थेतील रुग्ण सहज बरे होवून घरी येतील. आवश्यकता असेल तिथं गावातले डॉक्टर काही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला ऑनलाइन घेतील. गंभीर अवस्था होण्याआधीच व्यवस्थापन खूप ताण कमी करेल आणि गावातच लोक बरे होतात हा विश्वास या रोगाची अनावश्यक भिती संपवेल. लोकांची आर्थिक हानी व्हायची नाही. एखादे वेळी डॉक्टरांना वाटल की या पेशंटला थोड्या अधिक उपचारांची गरज आहे तर त्यासाठी थोड्या अधिक सुविधेच्या कोविड सेंटर मध्ये पेशंट पाठवला जाईल. आता एक प्रश्न राहतो खर्चाचा. गावातल्या कोविड सेंटरसाठीची मदत ही गावतूनच उभा करावी लागेल. गाव आणि प्रशासन यांच्या मदतीची बेरीज करावी लागेल. गावातील तरुण मंडळे शक्य तितक आर्थिक सहाय्य करतील. गावातील माणसं हे नक्कीच करू शकतील कारण गावातली माणसं मदतीला कधीच कमी पडत नाहीत, याचे अनेक दाखले आपण पहिले आहेत. महापूर आला तेंव्हा याच लोकानी दूध, कडधान्य शहरामध्ये पोहचवलं, आज सुद्धा ते काम चालू आहे. जिथं कोविड सेंटर चालू आहे अशा ठिकाणी अगदी भाजीपाल्यासाहित लोक मदत पाठवतात. त्यांचा हेतु शुद्ध आहे "माणसं जगली पाहिजेत". आपल्या भोवतालात माणसांचे आवाज घुमले पाहिजेत. लोकांचा या कोविड सेंटर उभारणीमध्ये असणारा प्रत्यक्ष सहभाग त्यांना जाग रहायला भाग पाडेल आणि तिसऱ्या लाटेचं नियोजनसुद्धा आपोआपच होईल. कारण ती लाट लहान मुलांसाठी घातक आहे असं तज्ञांच मत आहे जर तसं असेल तर लहान मुलांना घेवून या काळात ही सामान्य माणसं शहरात कुणाच्या दारात जातील. लहान मूल जरी असलं, तरी पेशंट कोविडचा आहे म्हटल्यावर त्याला एकट्याला सोडायची मानसिकता किती जणाची असणार आहे..! याचा विचार आज करायला पाहिजे. हा व्यवस्थापनाचा एकच मार्ग आहे असं मुळीच नाही, पण जे मार्ग आहेत ते वाट मुजण्याआधी बाहेर पडावेत हीच अपेक्षा..
*(शिवाजी विद्यापीठातून)*
✍️प्रदीप बोभाटे 8788144779
0 Comments