कोरोनाच्या काळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल


कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

ते शनिवारी पुण्यात प्रसारमध्यमांशी भाष्य केले. यावेळी त्यांनी लसीकरणाचे ग्लोबल टेंडर, मराठा आरक्षण आणि राज्यातील कोरोना परिस्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्याप परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार म्हणतात. पण मग मुळात लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द उच्चारलाच कसा?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे पालिकेला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लस खरेदीसाठी परवानगी दिली जात नसल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपात तथ्य असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
 
तसेच मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी भाजप काही लोकांना फूस देत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. नागपुरातील काही मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांना भाजप रसद पुरवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केला होता. मात्र, सचिन सावंत यांनी प्रथम त्याचे पुरावे सादर करावेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे इतक्या प्रो-अ‍ॅक्टिवली घराबाहेर पडले, हे कौतुकास्पद आहे. खरंतर त्यांनी यापूर्वीच पीपीई किट घालून बाहेर पडायला हवं होतं, अशी खोचक टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

Post a Comment

0 Comments