पै. अस्लम काझी ! अखंड महाराष्ट्राच्या कुस्तीशौकींनांच्या मनावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं, देशविदेशातल्या मल्लांना एक तप आस्मान दाखवलं.....


५१ गदा जिंकत,असंख्य किताब आपल्या नावे करत, एक विश्व विक्रम प्रस्थापित केला.असं कुस्तीतलं एक तेजोमय नाव,ज्यांना कुस्ती सम्राट हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कुस्तीच्या अभ्यासात अस्लम भाऊ सारखा लढवय्या मल्ल फार क्वचित पहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील सापटणे कुर्डूवाडी गावचे अस्लम काझी यांनी आपली कुस्ती कारकीर्द सुरु केली ती कोल्हापूर च्या गंगावेस तालमीतून. वस्ताद विश्वास हारुगले आणि हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या मार्ग्दर्शानाखाली त्यानी सराव करून कुस्ती क्षेत्रात अक्षरश आकाशाला गवसणी घातली..!
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा गाजायाची ती अस्लम भाऊंच्या शड्डूच्या घुनत्कारानी. एक एक वादळी मल्लाशी चार हात करून मैदान मारणारा रणमर्द म्हणजे अस्लम काझी. काझीनी तब्बल एक तप महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांच्या मनामनात अधिराज्य गाजवले.
एक काळ असा होता कि अस्लम काझी ची कुस्ती पहायला लोक हजारो किलोमीटर चा प्रवास करून मैदानाला हजेरी लावत असत. घरातून भाजी भाकरी बांधून घेवून काही कुस्ती शौकीन खास अस्लम ची वादळी कुस्ती पहायला येत असत..!

महाराष्ट्रासह कर्नाटकातील एक नंबरच्या जोडीत कित्येक वर्ष अस्लम काझी खेळत होते..! पैलवानांच्या आयुष्यात किती गदा मिळवू शकतो यालाही मर्याद असतात. पै.अस्लम काझी यांनी तब्बल ५१ मानाच्या गदेवर आपले नाव कोरले आहे..! मात्र आयुष्यात ''महाराष्ट्र केसरीची गदा''साठी प्राण पणाने लढूनही वेळोवेळी नशिबाने हुलकावणी दिली....! मात्र म्हणतात ना ''हार हमारी होगी लेकीन जीत से भी प्यारी होगी'' जे जे महाराष्ट्र केसरी झाले त्या त्या सर्वांशी चार हात करून अस्मान दाखवले ते अस्लम काझी यांनी..! त्यांच्या या दैदिप्यमान कुस्ती कारकिर्दीचे प्रतिक म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव मा.बाळासाहेब लांडगे यांनी त्याना मानाचा ''कुस्ती-सम्राट'' हा किताब देवून गौरव केला. कारण ५१ गदा मिळवून त्यानी महाराष्ट्राच्या कुस्तीच्या कारकिर्दीत एक इतिहास निर्माण केला होता .यापूर्वी हा किताब अगदी कमी वयात महाराष्ट्र केसरी झाले म्हणून पै.युवराज पाटील कोपार्डेकर यांना दिला गेला होता...!
कर्नाटकात एकेकाळी तब्बल एक महिना म्हणजे रोज उठून अस्लम काझींची कुस्ती असायची इतके कर्नाटकचे लोक अस्लम भाउंच्या कुस्तीसाठी वेडे झाले होते.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून अस्लम भाऊनी जशी निवृत्ती घेतली तशी अधिवेशन पहायची मजाच गेली असे अनेक कुस्ती-शौकिनांचे मत होते इतकी तुफानी कुस्ती होती त्यांची...!! कुस्ती-निवृतीनंतर अनेक मल्ल कुठेतरी व्यवसाय करत बाकीचे जीवन व्यतीत करतात,काही राजकीय आखाड्यात पदार्पण करतात मात्र अस्लम
भाऊनी निवृत्तीनंतर कुर्डूवाडी येथे नवोदित मल्लाना मार्गदर्शन करणे सुरु केले आहे.त्यानी मल्लांसाठी ''छत्रपती शिवराय कुस्ती संकुल '' या नावाने तालीम कुर्डूवाडी येथे सुरु केली.आज त्यांचे कित्येक पठ्ठे महाराष्ट्रातील अनेक मैदानातील क्रमाक एकचे मल्ल आहेत..! आज अस्लम भाऊ जरी कुस्ती निवृत्त असले तरी त्यांची वादळी
कारकीर्द महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन कधीच विसरू शकणार नाही..!


आजपर्यंत महाराष्ट्राच्या लाल मातीत अनेक कुस्तीगीर खेळाडू तयार होऊन गेले पण, अस्लम भाऊंसारखा खेळाडू लाखात एक तयार झाला. गुरुवर्य राम सारंग सर, विश्वास हारुगले वस्ताद, हिंद केसरी दिनानाथ सिह (आण्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या पठ्ठाने कुस्ती क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला होता. आपल्या वादळी खेळीने भल्याभल्या मल्लाना कोल्हापूरचे पाणी पाजणारा अस्सल पैलवान तो अस्लम..आपल्या नेत्रदीप कुस्तीने एक तप तमामकुस्ती शौकीनाच्या हृदयावर अधिराज्य केलं..!

  अस्लम भाऊ मूळचे सोलापूर जिल्ह्यातील (सापटणे) कुर्डुवाडीचे, पण कुस्तीतील जडणघडण ही कोल्हापूर च्या लाल मातीतच झाली. शांत व संयमी स्वभावाच्या अस्लम भाऊंनी अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात आकाशात गवसणी घातली. अस्लम भाऊच्या नुसत्या शड्डूने मैदान दणाणून जायचं. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो कुस्ती शौकीनाच्या गळ्यातील ताईत म्हणजे अस्लम असं काही जणू समीकरणच तयार झालं होतं. २००२ साल पासून तर अस्लम भाऊंच्या भात्यातील बॅक थ्रो,ढाक,घुटना डावा वरती देशातील नामवंत मल्ल देखील सुटले नाहीत.
(Advertise)

एक काळ असा होता की कोल्हापूर महापौर केसरी होणारा मल्ल हा देशातील नामवंत मल्ल म्हणून ओळखला जात होता. देशातील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होत असत. २००५ व २००६ साली अस्लम भाऊंनी सलग दोन वर्षे तुफानी कुस्ती करत "कोल्हापूर महापौर केसरी" होण्याचा बहुमान पटकावला. पुढे   नगर, ठाणे, मुंबई, सोलापूर, गोकुळ केसरी, अकलूज येथील त्रिमूर्ती केसरी मानाच्या गदे वरती देखील आपले नावं कोरले. संपूर्ण कुस्ती कारकीर्द एक, दोन नव्हे तर तब्बल ५१ मानाच्या गदा आपल्या मनगटाच्या जोरावरती अस्लम भाऊंनी मिळवल्या. एवढया मानाच्या विक्रमी गदा मिळवणारा मल्ल देशात अपवादाने क्वचितच पाहायला मिळेल.  हल्ली आजकाल गल्ली बोळातील मैदान मध्ये गदा मिळवणारे कित्येक मल्ल भेटतील, मात्र अस्लम भाऊंनी दिवस रात्र मैदानात घाम गाळून मिळवलेल्या गदेची मान व शान काही औरंच आहे.

अस्लम भाऊंनी आयुष्यातील एक पर्व एक चांगला खेळाडू म्हणून नाव लौकिक मिळवले नंतर दुसरं पर्व कुस्ती प्रशिक्षक म्हणून चमकत आहेत. कुर्डुवाडी येथे 'शिवराय कुस्ती संकुल' मध्ये शेकडो मल्लाना कुस्तीचे धडे देण्या बरोबर मन, मनगट व मेंदू सक्षम असणारी तरुण पिढी तयार करण्याचे कार्य अविरत पणे करत आहेत. आज अस्लम भाऊच्या या मल्लाच्या खाणीत महारुद्र काळेल, संतोष सुतार, सुनील शेवतकर, माऊली कोकाटे यासारखे कुस्तीतील कोहिनुर हिरे तयार होत आहेत.

आपल्या महाराष्ट्राने अनेक रांगडे नाद जपले, टिकवले वाढवले, असाच एक मातीतला नाद जोपासला या मातीने त्याच नाव कुस्ती. या मातीनं मातीतल्या या खेळाला अस्सल हिरे दिले या अस्सल हिऱ्यामधे ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेन असे धिप्पाड व्यक्तीमत्व म्हजे महान मल्ल कुस्ती सम्राट पैलवान अस्लम काझी. 

    कुस्ती मैदान खचाखच भरलेलं, मैदानात एक नंबरची कुस्ती समालोचकांनी पुकारावी आणि हजारो नजरा येनाऱ्या वादळाकडे त्या मल्लाची उत्सुकतेने वाट बगाव्यात.  बसलेल्या प्रेक्षकांनांच्या मधुन लांघ लंगोट चढवुन भला मोठा धिप्पाड देह मैदानात यावा, मैदानात आल्याबरोबर शड्डु ठोकवा आणि त्या शड्डुचा आवाज एेकल्याबरोबर मैदान शांत होवुन उत्सुकतेने विस्फारलेल्या हजारो डोळ्यांच्या अंगावरती काटा यावा, शड्डु ठोकुन तो मल्लांने पळत मैदानाला फेरी मारुन जनताजनार्दांचे दर्शन घ्यावे आणि ती आखीव रेखीव तब्बेत आणी त्या मल्लाचा उत्साह तेज पाहताना बगणाऱ्यांच्या अंगात देखील स्फूर्ती चढावी असं व्यक्तीमत्व म्हजे कोल्हापुरच्या प्रसिद्ध गंगावेश तालमीचे महान मल्ल पैलवान अस्लम काझी. 

महाराष्ट्रच नव्हे तर सगळ्या हिंदुस्तानातील कुस्ती रसिकांना स्वतःच्या आगळ्या वेगळ्या वादळी खेळाच्या शैलीने भुरळ पाडणारे महान मल्ल अस्लम काझी. चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटण्याचा काळ असतो तसा या महाराष्ट्रात गावोगावो यात्रांचा काळ सुरु होतो. आणि या यात्रांना कुस्ती मैदानाशिवाय शोभा ती कसली.  ज्या प्रमाणे जेवणात आपल्या आवडीचा पदार्थ असेल तर त्या अन्नाची आपल्याला जास्तच उत्सुककता लागलेली असते अगदी तसेच कुस्ती मैदानात पै. अस्लम काझी यांची कुस्ती असेल कुस्ती मैदानाच्या दिशेने लोंढेच्या लोंढे मैदानाकडे वाट चालायला लागलेले दिसुन यायचे.  

ज्या प्रमाणे महाराष्ट्राला माननीय शरद पवार साहेब हे भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा असायची अगदी तसचं तमाम महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांना पै. अस्लम काझी हे महाराष्ट्र केसरी व्हावेत अस वाटायचं. महाराष्ट्र केसरी च्या अनेक अधिवेशनात त्यांच्या कुस्त्या तुफानाप्रमाणे गाजल्या. जरी त्यांना महाराष्ट्र केसरी च्या गदेने हुलकावनी दिली असली तरी तमाम कुस्ती शौकीनांच्या मनात त्यांची प्रतिमा ही महाराष्ट्र केसरी हीच आहे..
      
 देशातल्या अनेक मैदानात कुस्ती सम्राट पैलवान अस्लम काझी यांची कुस्ती नंबर एकला असायची.  भल्या भल्या दिग्गज मल्लांशी दोन हात करुन आपल्या कुस्ती कौशल्याने कुस्ती शौकीनांच्या मनात वेगळीच आदराची जागा निर्माण केली.  महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या वतीने त्यांचा कुस्ती सम्राट हा किताब देवुन त्यांचा व त्यांच्या वादळी खेळीचा सम्मान केला.कुस्ती शौकीनांच्या हदयावर ज्यांनी अल्पवधीतच अधिराज्य गाजवलं असे महान व्यक्तिमत्व पै अस्लम काझी. 
       
अगदी अलिकडील वर्षात त्यांनी कुस्ती खेळण्यातुन निवृत्ती घेतली असली तरी कुस्ती क्षेत्रातातुन ते कधीच निवृत्त झाले नाहीत आणि होनारही नाही कारण त्यांचा श्वास आणि ध्यास केवळ कुस्ती हाच आहे आणि त्याच भावनेतुन त्यांनी नवोदीत मल्लासाठी कुर्डुवाडी येथे भव्यदिव्य असा कुस्ती आखाडा उभा केलेला आहे. त्यांचे अनेक पठ्टे आज महाराष्ट्रातील मैदाने गाजवताना दिसतायेत. त्यांच्या पठ्याने कुस्ती मारल्यावर " आर हाय बग कुस्ती सम्राट  अस्लम काझी वस्तादांचा आवडता पट्टा " अशी विजयी आरोळी एेकली की डोळ्यासमोर उभी राहते धिप्पाड देहाची आणि बलाढ्य कर्तृत्वाची कुस्ती सम्राट पैलवान अस्लम काझी यांची प्रतिमा. 
        
आजही एकाद्या मैदानात एकाद्या पैलवानाने शड्डु ठोकला की जेष्ठ पुजारी आण्णा लगेच आठवण सांगतात की " शड्डु ठोकवा अस्लम काझी पैलवाननेच, वाळक्या भरीव लाकडावर ठोका टाकल्यावर खाट् खाट् वाजाव तसा आवाज घुमायचा मैदाना." मला प्रत्यक्ष त्यांची कुस्ती पाहण्याचा योग नाही आला पण मात्र जुने काही व्हिडीओ पाहीले की कळतं महाराष्ट्र का फिदा होता या व्यक्तीमत्ववरती. 
     
असे महान मल्ल कुस्ती सम्राट तब्बल ५१ गदेचे मानकरी अनेक मल्लांचे आश्रयदाते कुस्ती मल्लविद्याचे पुजारी पै. अस्लम काझी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या हातुन लाल मातीची अशीच सेवा घडत राहो हीच बजरंगबली कडे प्रार्थना. 

कुस्ती मल्ल आणि प्रत्येक कुस्ती प्रेमींच्या मनातले सम्राट पै.अस्लम काझी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

लेखन- शिवलिंग शिखरे, पैलवान रामदास देसाई, गणेश मानगुडे

संकलन - "लोकवार्ता टीम"

Post a Comment

0 Comments