मोहोळ/प्रतिनिधी:
मोहोळ तालुक्यातील एकुरके येथे मोहोळ पोलिसांनी अवैध वाळू उपशावर कारवाई करीत तब्बल ९८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील सीना नदी पात्रात एकुरके हद्दीतील स्मशानभूमीजवळ मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मोहोळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळाली. त्यांनी सोबत असलेल्या पोहेकॉ गणेश पोफळे, पोकॉ अमोल घोळवे, चालक पोकॉ शिवणे, पोकॉ सचिन पुजारी यांच्यासोबत जाऊन पाहणी केली.
त्या ठिकाणी एका जेसीबी च्या माध्यमातून वाळू साठा करून सहा ट्रॅक्टरमधून वाहून नेण्याचे काम केले जात असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांना बघताच त्याठिकाणी असलेल्या वाळू चोरट्यानी पलायन केले. या वाळू चोरट्याबद्दल पोलिसांनी चौकशी केली असता विलास भीमराव ढेरे, उमेश भारत ढेरे (दोघेही रा. बोपले) अमोल भास्कर ढवण, नानासाहेब चांगदेव साठे, सोमनाथ नागन्नाथ कोल्हाळ, निलेश उत्तम कोल्हाळ (चोघेही रा. एकुरके) असल्याचे नावे समोर आली.
तसेच सदरची वाळू एकुरके पोलीस पाटील तानाजी भानुदास साठे यांच्या बांधकामासाठी वाहून नेत असल्याचे समजले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करीत पोलिसांनी एक जेसीबी, सहा ट्रॅक्टर व बारा ब्रास वाळूसह असा एकूण ९८ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मोहोळ पोलिसांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाळू तस्करीचे धाबे दणाणले आहेत.
0 Comments