जेऊर/प्रतिनिधी;
लग्नानंतरही महिलेने विविध प्रकारच्या दुर्मिळ वृक्ष लागवडीचा व संवर्धनाचा छंद जोपासला असून, सध्या त्यांच्या शेतातील बागेत ४६ प्रकारच्या दोनशेपेक्षा जास्त फळे, औषधी व फुलझाडांचा संग्रह आहे. त्यांच्या फुले, औषधी वनस्पती व वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येणाऱ्या फळांचा नातेवाईक, मित्रमंडळींना आस्वाद मिळतोच; पण हा छंद एक उत्पन्नाचे साधन बनून यापासून कुटुंबाला आर्थिक मदतही होऊ लागली आहे.
शेटफळ (ता. करमाळा) येथील हर्षाली प्रशांत नाईकनवरे (Harshali Naiknavare) या विवाहितेने लहानपणापासूनच विविध प्रकारच्या वृक्ष लागवडीचा छंद लग्नानंतरही जोपासला आहे. फणस, काजू, संत्री, ड्रॅगन फूड, अंजीर, अननस यांसारखी परिसरात न आढळणारी याचबरोबरच आंबा, पेरू, सीताफळ, मोसंबी, चिंच, आवळा यांसारख्या देशी व संकरीत फळांच्या विविध जातींच्या वृक्षांची लागवड त्या केल्या चौदा वर्षांपासून करत आहेत. यासाठी कोणत्याही रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर करत नाहीत, हे विशेष. सध्या त्यांनी लावलेल्या अनेक झाडांना चांगली फळे लागत असून त्यांचा आस्वाद कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवारांना तर मिळतोच परंतु आंबे, आवळे, चिंचा, पेरू या फळांची विक्री होऊन यापासून आर्थिक उत्पन्नही मिळू लागले आहे. या वृक्ष लागवड व संवर्धनाच्या छंदामध्ये त्यांचे पती व सासू यांचेही सहकार्य मिळत असून त्यांची बाग या परिसरातील चर्चेचा व अनुकरणाचा विषय बनली आहे.
हर्षाली यांचे माहेर तालुक्यातील कंदर येथील असून लहानपणापासून त्यांना विविध प्रकारचे वृक्ष लागवडीचा छंद होता. त्यांनी लग्नापूर्वी आपल्या वडिलांच्या येथे आंबा, नारळ, पेरू यांसारखी फळांची व गुलाब, मोगरा, जाई-जुई, चाफा यांसारखी फुलांची झाडे लावली होती. मे २००७ मध्ये त्यांचा विवाह प्रशांत नाईकनवरे यांच्याशी झाला. त्यांच्याही शेतात त्यांनी विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आपला छंद (Verses) जोपासण्यास सुरवात केली. त्यांची आवड लक्षात घेऊन पती प्रशांत यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. याशिवाय बाहेर ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, रोपे ते आवर्जून घेऊन येतात. सासू प्रभावती यासुद्धा बागेतील कामासाठी त्यांना मदत करतात. येथे शेतात येणाऱ्यांना कायम फळाफुलांची मुक्तहस्ते वाटप सुरू असते. याचा उपयोग परिसरातील लोकांना होतो. सध्या लोक मोठ्या प्रमाणावर आलेल्या विविध फळांची मागणी करू लागले असून यापासून आर्थिक फायदाही मिळू लागला आहे.
फळे, फुले अन् औषधी वनस्पती
सध्या त्यांच्या शेतातील बागेत फणस, काजू, अंजीर, ड्रॅगन फूड, सुपारी, अननस, खारीक यांसारखी या भागात दुर्मिळ असणारी फळे तसेच सोळा वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची, चार प्रकारच्या पेरूची, चार प्रकारच्या सीताफळाची, तीन प्रकारच्या निंबोणीची, तीन प्रकारच्या पपईची, दोन प्रकारचे नारळ, तीन प्रकारच्या चिंचा, दोन प्रकारचा आवळा, जांभूळ, चिक्कू, मोसंबी, बदाम यांसारख्या फळांची तर गुलाब, मोगरा, जाई-जुई, चाफा, कर्दळी यांसारख्या फुलांची, अर्जुन, कांचन, पाणफुटी, अक्कलकाढा, कोरफड, नागकेशर, तुळस, रानतुळस, कुटकुटी, कडीपत्ता यांसारखी औषधी वनस्पती तर विविध प्रकारची शोभेची झाडे आहेत.
0 Comments