पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मोदी सरकारने (government) पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. मोदी सरकारने इंधन दरवाढ केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं एक ट्विट व्हायरल होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर मोदी सरकार इंधन दरवाढ करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे ट्विट नेटकऱ्यांकडून चांगलंच व्हायरल केलं जात आहे.
काय होतं ट्विट?
रोहित पवार यांनी २ मे रोजी म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच एक ट्विट केलं होतं. आता चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलं आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. त्यांचं हे भाकीत खरं ठरल्याने नेटकऱ्यांनी हे ट्विट व्हायरल केलं असून त्यावर कमेंटचा पाऊसही पाडला आहे.
आजचं ट्विट
आज केंद्राने इंधन दरवाढ केल्यानंतर रोहित यांनी पुन्हा ट्विट केलं आहे. जी भीती होती, ती अखेर खरी ठरली, असं सूचक विधान रोहित यांनी केलं आहे. या ट्विटसोबत (twitter post) त्यांनी त्यांचं ट्विट आणि मराठीची बातमीही एम्बेड केली आहे.
इंधन दर किती वाढले?
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये २७ फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हते. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज होता. त्यानुसार मंगळवारी पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले. तब्बल ६६ दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात इंधनाचा आजचा दर काय?
मुंबई: पेट्रोल- 96.95, डिझेल 87.98
पुणे: पेट्रोल- 96.60, डिझेल 86.30
नाशिक: पेट्रोल- 97.36, डिझेल 87.04
औरंगाबाद: पेट्रोल- 98.19, डिझेल 89.22
0 Comments