सोलापूर/प्रतिनिधी:
महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) व मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नंबर लागणार असून ते लवकरच भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीत असतील,' असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते सोलापूरात बोलत होते.
एका खासगी दौऱ्यानिमित्त सोमय्या सोलापूरात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी 'सचिन वाझेंसोबत पाच ऑफिसर निलंबित झाले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली, परमबीर सिंग घरी गेले, आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर आहे, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
हे सरकार पाच वर्ष टिकावं मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणारं आहे, असं सोमय्या यावेळी म्हणाले.
तर अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर आहे. त्यामुळं "आगे आगे देखो होता हैं क्या"असं म्हणत सोमय्यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांना ही लक्ष्य केले आहे. 'महाविकास आघाडी सरकारने सत्तेची इतकी घमेंड करू नये जालन्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना पाच पोलिसांकडून जी मारहाण झाली ती निंदनीय आहे. त्यातील चार पोलीस निलंबित झाले आहेत. पण या प्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी व्हायला हवी,' अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.
0 Comments