तिसरी लाट दारावर, मास्टर प्लान करा


नागपूरसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण म्हणून सुखावून जाऊ नका. कोरोनाची तिसरी लाट दारावर आहे. मास्टर प्लान करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या. 

गेल्या वर्षभरात सतराशे बेडवरून सुमारे 9 हजार बेड आम्ही निर्माण केले. मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलच सुरुवात केली. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता होईल यासाठी थेट हवाईदलापासून रेल्वे पर्यंत मदत घेतली. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. आरोग्यविषयक मनुष्यबळातही वाढ केली आहे. वर्षभरात केवळ आरोग्यावर काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दशलक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेडसह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना मागे सोडले आहे. मात्र तरीही तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही यंत्रणा देखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा, असे आदेश नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिले.

नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली काल एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्हा हा तातडीने ऑक्सिजन (oxygen)निर्मिती बाबत स्वयंपूर्ण बनविण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकीकडे मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करताना जिल्ह्यात 25 ऑक्सिजन पीएसए उभारण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजनची उपलब्धता यावरच पुढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प पूर्ण करा. कोरोना रुग्णांसाठी 5 हजार जंबो सिलेंडर उपलब्ध करणे पुढच्या लाटेत आवश्यक ठरणार आहे. 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे निर्देश राऊत यांनी बैठकीत दिले. 

दररोज दहा हजार चाचण्या करा

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एकीकडे लॉकडाउनसाठी आग्रही राहावे लागत आहे. मात्र सुपरस्प्रेडरसुद्धा तपासले जातील याची काळजी महानगरपालिकेने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी महानगरपालिका व शहर मिळून दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील कोविड केअर सेंटर सक्षम करणे गरजेचे आहे. मेडिकल, मेयो एम्स व शहरातील अन्य खाजगी हॉस्पिटल वरील ताण कमी करण्यासाठी याकडे लक्ष वेधा.इंदोरा भागातील आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल, हज हाऊसचे श्रेणी वर्धन करण्यासाठी तसेच ग्रामीण मधील कोराडी, कामठी, रामटेक, मौदा,उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणी वर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. पुढच्या लाटेमध्ये लहान मुलेसुद्धा लक्ष्य ठरणार आहेत.लहान मुलांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

स्थानिक डॉक्टरांना मानधन

शहर व ग्रामीण भागात स्थानिक डॉक्टरांना होम कॉरंन्टाइनची शुश्रूषा करण्याचे निर्देश लवकरच राज्य शासन देणार आहे. त्यासाठी त्यांना मानधनही दिले जाईल. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची यादी तयार करण्याचे त्यांनी सांगितले. रेमडेसिवीर अन्य काही औषधांचा अतिरेकी वापर केल्यामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम दिसत आहे. त्यामुळे ट्रिटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments