कोरोनामुळे काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा ५६,२०० रुपयांवर गेले होते. तर या वर्षीच्या मार्चमध्ये सोन्याचे दर जवळपास ४४,०० रुपये प्रति तोळा, अशा निच्चांकी पातळीवर पोहोचले होते.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. असं असलं तरी अद्याप गेल्या वर्षीच्या सर्वोच्च किंमतीपेक्षा हे दर कमीच आहेत.
सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली, तर दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 'एमसीएक्स'वर (Multi Commodity Exchange) आज सोन्याचा दर ०.०२% च्या तेजीमुळे ४८,७९४ रुपये प्रति तोळा झाला होता. जुलैसाठीच्या चांदीची वायदे किंमत ७१,४०० रुपयांवर ट्रेड करीत आहे. बुधवारी (ता.26) चांदीचे दर ७२,६३१ रुपये प्रति किलो होते.
सोन्यात गुंतवणूक वाढली
कोरोना संकटामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोन्यात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत. पुढील काळातही सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी तेजी येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे 'गोल्ड ईटीएफ'मध्ये गुंतवणूक वाढली आहे.
0 Comments