होम क्वारंटाईन रुग्णांवर योग्य उपचाराचे शिवधनुष्य 'माझा डॉक्टर्स'नी उचलावे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई:

राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या “ माझा डॉक्टर” या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत असून आज राज्यभरातील सुमारे १७ हजार ५०० फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक यांच्याशी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी सुमारे दोन तास संवाद साधून कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले. 

संपूर्ण महाराष्ट्रातील फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत या लढाईत उतरावे, घरीच राहून उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य सर्व माझा डॉक्टरांनी उचलावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. "प्राथमिक आरोग्य केंद्रातून करोनावर उपचार" या विषयावर आयोजित ऑनलाईन परिषदेत ते बोलत होते. राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 
     
या परिषदेत कोविड विषाणुला हद्दपार करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं असून तुमच्या सहकार्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ७० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. यातील बरेच घरीच विलगीकारणात उपचार घेत असतात. अशावेळी डॉक्टरांची भूमिका महत्वाची असून रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि गरज असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, अशा पद्धतीने गृहविलगीकरणातील रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन झाल्यास मृत्यू दर ही कमी करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 कोरोना रुग्णांचे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, याकडे सर्व डॉक्टरांचे लक्ष वेधले. तसेच फॅमिली डॉक्टर्सना दिवसातून एकदातरी जवळच्या कोविड रुग्णालयात सेवा द्या, असे आवाहन त्यांनी केलं आहे. काही दिवसात पाऊस सुरु होत असल्याने, पावसाळी आजार रोखणे गरजेचे असल्याचं सांगत, पावसाळ्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मोठ्याप्रमाणात करण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होणारा कोरोनाचा धोका ओळखून राज्य शासनाने आतापासूनच तयारी सुरु केली असल्याचं सांगत बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स स्थापन केला असल्याची त्यांनी माहिती दिली. 
       
डॉक्टर्स सध्या या कठीण काळात देत आसलेल्या योगदानाबद्दल आभार मानत, डॉक्टर नावाच्या या देवदूताच्या मदतीने ही लढाई आपण नक्की जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments