बार्शीच्या संशोधकाची नवी थेरपी! कोविडमुक्तीसाठी एस. डब्ल्यू थेरपी ठरू शकते प्रभावी - डॉक्टर सुहास कुलकर्णी


बार्शी/प्रतिनिधी;

सध्याच्या कोरोना महामारीत असंख्य रुग्णांचे प्राण ऑक्सिजन अभावी संकटात आले आहेत. याचे मूळकारण म्हणजे कोरोनाव्हायरस मुळे होणारे फुफ्फुसाची हानी व त्यामुळे निर्माण होणारा शरीरातील ऑक्सिजनचा तुटवडा हे आहे. या परिस्थितीत एस. डब्ल्यू. थेरपीचा वापर केल्याने रुग्णाचे प्राण वाचवता येतील व इतर बऱ्याच सहवेदना मुळे होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी होऊन त्यातून रुग्णांची मुक्तता होऊ शकते, असे मत बार्शी येथील सूक्ष्मजीवशास्त्राचे संशोधक डॉ. सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

एस. डब्ल्यू. थेरपी म्हणजे सॅच्युरेटेड वॉटर थेरेपी होय. या थेरपीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पाण्यामार्फत पोटातून करता येईल. एअरेटरचा ( एअर पंप जो फिश पाँन्ड मध्ये वापरतात) वापर करून अतिथंड पाण्यात हवा सोडून त्यातील ऑक्सिजन विरघळवता येतो. एक लिटर पाणी सॅच्युरेटेड करण्याकरिता फक्त एक तास लागतो. या पद्धतीने बारा मिलीग्राम प्रति लिटर पर्यंत ऑक्सिजन पाण्यात विरघळवता येतो. त्याचे वास्तविक नैसर्गिक पद्धतीने साध्या पाण्यात हेच प्रमाण फक्त पाच ते सहा मिलीग्राम प्रति लिटर एवढेच असते. अशा प्रकारे तयार केलेले ५०० ते ८०० मिलिलिटर सॅच्युरेटेड वॉटर पिण्यायोग्य थंड असताना रुग्णाला प्यायला द्यायचे आहे. पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचे असून पिल्यानंतर पुढील एक ते दीड तास कुठल्याच प्रकारचा व्यायाम अथवा श्रम करायचे हे नाही. या काळात पाण्याचे शोषण लहान आतड्या मधील पेशींमध्ये व रक्तामध्ये निष्क्रिय शोषण (पॅसिव्ह ॲब्सॉरप्शन) या पद्धतीने होते. त्यामुळे सहाजिकच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ऑक्सिजन पाण्यात जरी कमी प्रमाणात विरघळत असला व रक्तात त्या प्रमाणात पाठवला जात असला तरी शरीरातील ऑक्सिजन तुटवड्याच्या परिस्थितीत ते प्रमाण मोलाचे ठरते. शरीरात अशा प्रकारे पोटातून ऑक्सिजनचा पुरवठा केल्यामुळे फुफुसाकडून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी कमी होते. व त्यामुळे फुफुसाला थोडी का होईना विश्रांती मिळते. याचा फायदा म्हणजे रुग्णाला आलेला थकवा कमी होण्याची शक्यता बळावते.

रुग्णाने या सॅच्युरेटेड थेरपीचा वापर केल्याने लहान आतड्यातील पेशी अतिकार्यक्षम होऊन पोटातील इतर विकाराच्या त्रासातून देखील रुग्णाची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता वाढते. या सॅच्युरेटेड वॉटर थेरपीचे दुष्परिणाम नसल्याने पोस्ट कोवीड तसेच घरीच क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी ही थेरपी प्रभावी ठरू शकते.

संशोधक डॉ. सुहास कुलकर्णी हे सूक्ष्मजीवशास्त्राचे निवृत्त प्रोफेसर व माजी सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख असून मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत तसेच ते मराठी विज्ञान परिषद शाखा, बार्शी चे उपाध्यक्ष आहेत.

Post a Comment

0 Comments