बार्शी/प्रतिनिधी:
नवतंत्रज्ञानामुळे माध्यमक्रांतीचा अविष्कार पहायला मिळाला अन् सारं जग मोबाईलच्या निमित्ताने हाताच्या तळव्यावर आले. सध्यस्थितीतही पूर्वीप्रमाणेच वास्तववादी बातमीशी एकनिष्ठ असलेली पत्रकारिता हवी, असे मत माजी मंत्री अॅड. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
आनंदयात्री प्रतिष्ठानच्यावतीने व विरोधीपक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे यांच्या पुढाकारातून शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध' ग्रंथ माजी मंत्री अॅड. सोपल यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. गर्दी टाळत अनेकांनी हा कार्यक्रम ऑनलाईन अनुभवला.
पक्षपातीपणाचा वास येऊ नये यासाठी पत्रकारांनी बातमी देताना सजगता, दक्षता व सावधगिरी पाळली पाहिजे. स्पर्धेचा काळ असला तरी मुद्रित, दृकश्राव्य व डिजिटल माध्यमे या प्रत्येक माध्यमांचे महत्त्व अबाधितच आहे. बातमीदारी करताना पत्रकारांनी लोकमताचे प्रतिनिधीत्त्व केले पाहिजे, असेही अॅड. सोपल म्हणाले. यावेळी लेखक सचिन वायकुळे यांनी पत्रकारांना मार्गदर्शनासाठीच हा ग्रंथ लिहिल्याचे सांगितले, तर मयूर गलांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
पत्रकारांसाठी आयोजित या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, नगरपालिका विरोधीपक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे, ज्येष्ठ पत्रकार भ.के. गव्हाणे तसेच संतोष सूर्यवंशी, मयूर गलांडे, डिजिटल मीडियाचे असोसिएशन तालुका अध्यक्ष अजय पाटील, जिल्हा सदस्य विजय कोरे, कुतूहल न्यूजचे इरशाद शेख, जनसागर न्यूज संपादक सागर गरड, जनवार्ता न्यूज संपादक दयानंद पिंगळे, माझा न्यूज संपादक विनोद ननवरे लोकवार्ता चे संपादक अर्जुन गोडगे, संघर्ष न्यूजचे धीरज शेळके यांच्यासह सर्व डिजिटल व प्रिंट माध्यमाचे पत्रकार उपस्थित होते. कोरोना संसर्गाचे भान ठेवत संयोजकांनी केवळ पत्रकारांनाच निमंत्रित केले होते. समाजमाध्यमांवरच अनेकांनी ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमाचा अनुभव घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रामचंद्र इकारे यांनी केले तर प्रशांत घोडके यांनी आभार मानले. आनंदयात्री प्रतिष्ठानचे इतरही सदस्य यावेळी उपस्थित होते.
0 Comments