"पवार साहेब ; दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण..." भाजप आमदार अनिल बोंडेंचे शरद पवारांना खरमरीत पत्र



 अमरावती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मदत करण्याची मागणी केली. पवारांच्या या पत्रावर विरोधकांकडून सडकून टिका केली जात आहे. भाजप आमदार आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही पवार यांना खरमरीत पत्र लिहून धारेवर धरले आहे. 

अनिल बोंडेंनी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हे पत्र अपलोड केले आहे. तसेच या पत्रातून शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि बारा बलुतेदारांच्या समस्यांकडे पवारांचे लक्ष वेधले व या वर्गासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा आग्रह धरलाय.

पवार साहेब, मुख्यमंत्री फक्त तुमचचे ऐकतात. दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच. किंबहुना दारुवाल्यांच्या आशीर्वादावरच तुमची मदार असेल. परंतु, महाराष्ट्रातील १५० लाख शेतकरी कुटुंब अडचणीत आहेत. शेतमजूर सुद्धा सरकारकडे आशेने पाहत आहेत. बारा बलुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारची मदतीची आवश्यकता आहे. या सर्वांजवळ दारुवाल्यांसारखी मालमत्ता नाही. या सर्व दुखीतांच्या पीडीतांच्या मदतीसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहाना, असे आग्रह बोंडेंनी या पत्रातून केलाय.

कोरोना काळातील घरगुती वीज बिल माफ करू, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, पहिली लाट ओसरताच महावितरणने शेतकरी, शेतमजूर, आणि सामान्यांच्या घराची वीज कापण्यास निर्दयीपणे सुरुवात केली. विधानसभेत दिलेली वीज कापण्याची स्थगिती ऊर्जा मंत्र्यांनी उठवली. ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले. आणि आता तर पुन्हा लॉकडाऊन लावला. मजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना एक पत्रं लिहाना, असे त्यांनी म्हटलेय.

महाराष्ट्रातील शेतकरी या वर्षी संकटात आहेत. कोरोनामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही. शेतातून माल काढूनही विकला जात नाही. काही काळासाठी तरी शेतकऱ्यांना विक्री करण्याची सवलत देण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहाना. अवकाळीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि १० हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली. अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळीने बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. गेल्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा अवकाळी पाऊस, वादळे झालीत. शेतकऱ्यांचा कांदा, आंबा याचे अतोनात नुकसान झाले. परंतु सरकारनं साधी दाखलही घेतली नाही. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments