राज्यातील या महाविकासआघाडी सरकारला जवळपास दीड वर्षे झाली आहेत. मात्र, आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीमध्ये बिनसल्याचे म्हटले जात आहे. जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नव्हे तर ह्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समोर येत आहे.
प्रशासनाला हाताशी धरुन मुख्यमंत्री राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्याबाबत राष्ट्रवादीकडून थेट खुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंतच ही नाराजी पोहोचवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या संपूर्ण नाराजी नाट्यामुळे मुख्यमंत्री प्रचंड अस्वस्थ असल्याचे देखील म्हटले जात आहे.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असा कुठलाही डाग सरकारवर लागू नये, अशी मुख्यमंत्र्यांची भावना आहे. म्हणूनच जलसंपदा विभागाच्या कामात घाईने निर्णय घेतला जावू नये, असे मत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांकडे व्यक्त केल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यामुळे दीड वर्षात पहिल्यांदाच आता राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बिनसल्याचे म्हटले जात आहे
“मंत्रिमंडळाची चर्चा बाहेर सांगू नये अशी प्रथा आहे. त्यामुळे, मला याबाबत काहीही भाष्य करायचे नाही. मला जे काही बोलायचे आहे ते गरज वाटल्यास मी थेट मुख्यमंत्र्यांशीच बोलेन. काम करत असताना नाराजी धरायची नसते. त्या त्या वेळी तो तो विषय असतो.”-
जलसंपदामंत्री जयंत पाटील
0 Comments