"पदोन्नतीमधील आरक्षण रद्दचा शासननिर्णय त्वरीत रद्द करावा तसेच मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे :आरक्षण बचाव समिती, शिरोळ तालुका"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

शासकीय नोकरीमधील पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केलेचा शासन निर्णय आणि मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबतचे निवेदन मा.नायब तहसीलदार पी.जी.पाटील यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
        
मुळात संपूर्ण देशात कोरोना महामारीने रुद्र रूप धारण केले असताना संपूर्ण देशपातळीवर नागरिकांची मानसिक व आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय खेदजनक आहे. मुळातच भारतीय राज्यघटनाबाह्य असून कलम १६ चा अवमान करणारा आहे. तरी तो शासन निर्णय लवकरात लवकर रद्द करावा आणि समस्त मागासवर्गीय समाजाला नोकरीमधील विविध पदांवरील प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची मागणी या कृती समितीच्या माध्यमातून होताना दिसत आहे.
     
भारतीय संविधानाप्रमाणे आरक्षण म्हणजे वंचित, दुर्बल व पिडित मागासवर्गीय समाजाला दिलेले प्रतिनिधीत्व असून या समस्त घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे ते एक कायदेशीर साधन आहे. त्यामुळे अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी), ओबीसी आदी मागासवर्गीय घटकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
     
सरकारच्या या निर्णयाने महाराष्ट्रभर मागासवर्गीय समाजावर झालेल्या या अन्यायाविरोधात आवाज बुलंद होत असून निषेध व्यक्त होत आहे. या शासन निर्णयाविरोधात एससी, एसटी व ओबीसी समाजातून तीव्र असंतोष निर्माण होत आहे.
  
तसेच मराठा समाजालाही राज्य सरकारने आरक्षण द्यावे. जेणेकरून मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल, पिडित व वंचित असलेला समुह मुख्य प्रवाहामध्ये येण्यास आणि आपली सामाजिक व शैक्षणिक प्रगती करण्यास सक्षम होईल. हे दोन्ही निर्णय समाजाच्या व  जनहितासाठी लवकरात लवकर घेऊन या घटकांना दिलासा द्यावा, असे या निवेदनात आरक्षण बचाव समिती, शिरोळ तालुक्याच्यावतीने मा.नायब तहसिलदार शिरोळ यांना देण्यात आले आहे.
     
 या निवेदनावर समिती सदस्य विश्‍वजित कांबळे, अमित वाघवेकर, नितिन कांबळे, प्रविण शिंदे, सुनिल कांबळे, केवल कांबळे आदींच्या सह्या आहेत. या निवेदनाचा साकल्याने विचार होऊन या संबंधित घटकांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments