हातात टिकाव घेऊन पोलिस उपनिरीक्षक स्वाती भरणेंनी अवैध गावठी दारु अड्ड्यावर

 

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या कोयाळी, भिवरेवाडी, आंबी व शिरजगाव या हद्दीत अवैध गावठी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या पथकाने छापे टाकून दारूसाठा नष्ट केला. एकूण ५,९८,९०० किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार संबंधित दारूभट्टी चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयाळी गावच्या हद्दीत, कडका वस्तीजवळ भीमा नदीकाठी काटवनात (ता. खेड, जि. पुणे) अवैध दारू निर्मिती केली जात आहे. त्याठिकाणी दयाराम नाथाजी चौधरी हा गावठी दारूची निर्मिती करत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वाती भरणे यांना समजले. तेथे ३००० लिटरचे रसायनाने भरलेले लोखंडी बॅरल, ६०० लिटरचे भट्टी बॅरल, त्यात अंदाजे दोनशे लिटर उकळते रसायन, ३५ लिटरचे १० कॅन गावठी दारूने भरलेले असा एकूण २,१२,८५० रुपयांचा मुद्देमाल आढळला. स्वाती भरणे यांनी स्वतः हातात टिकाव घेऊन तो साठा नष्ट केला.

तसेच कोयाळी, भिवरेवाडी, आंबी व शिरजगाव गावच्या हद्दीत निरीक्षक राज्य उत्पादन तळेगाव दाभाडे विभाग पुणे यांच्या पथकाने छापा टाकून २ वाहने जप्त केली. येथे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा ३, ८६, ०५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. असा एकूण रु.५, ९८, ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

ही कारवाई निरीक्षक आर एल खोत, उपनिरीक्षक स्वाती भरणे, प्रवीण देशमुख, अशोक राऊत, राहुल जौजाळ, भागवत राठोड, हनुमंत राऊत यांनी केली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९चे कलम ६५ (B), (E), (F) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती भरणे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments