देश संकटात असताना गृहमंत्री अमित शहा गायब ? पोलीसात तक्रार दाखल...


 देश कोरोना सारख्या अतिशय कठीण प्रसंगातून जात असताना देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती गृहमंत्री अमित शहा मात्र बेपत्ता आहेत, अशी तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयूआय) सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली आहे. अशा संकट प्रसंगी पळून न जाता देशवासियांची काळजी घेणं आणि सेवा करणं हे राजकीय व्यक्तीचं काम असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. 
   
  देशावर सध्या कोरोनारुपी मोठं संकट ओढवलं आहे. खूप कठीण काळातून देश सध्या मार्ग काढत आहे. वाढत असलेली रुग्णसंख्या आणि तोडकी पडणारी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ऑक्सीजन, औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज देशातील परिस्थितीचा आढवा घेत असून संबधित राज्यांना सूचना करत आहेत. देशातील सर्व सरकारी यंत्रणा कोरोना विरोधात लढत आहे. या कोरोना काळात गृहमंत्री अमित शाह मात्र गायब आहेत. अशी तक्रार दिल्ली पोलिसांत करण्यात आली आहे.
     
 तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलीस नागेश करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी 'एनएसयूआय'च्या कार्यालयात आले होते. असा दावा एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते लोकेश चुघ यांनी केला आहे. ते म्हणाले की, २०१३ पर्यंत राजकारणी नागरिकांप्रती जबाबदार होते. पण त्यानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर हे चित्र पुर्णपणे बदलले. आता पंतप्रधानानंतर सर्वात महत्वाची व्यक्ती असलेले गृहमंत्री कोरोना महामारीच्या काळात हरवले आहेत.

Post a Comment

0 Comments