धक्कादायक! पुण्यात हत्या झालेल्या ७५ वर्षीय वृद्धेवर हत्येपूर्वी आणि नंतरही लैंगिक अत्याचार, पोलिसांनी २४ तासांत असा लावला छडा


 चाकणमध्ये झालेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी मंगळवारी एका ५२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या महिलेचा अर्धनग्न मृतदेह सोमवारी पोलिसांना चाकणजवळच्या गावात तिच्या घरामध्ये आढळला होता. मात्र या हत्या प्रकरणात आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे. मृत वृद्धेवर मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

 
पोलिसांनी सोमवारी महिलेचा मृतदेह घरात अर्धनग्न अवस्थेत सापडल्यानंतर या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला. मृतदेहाची अवस्था पाहता महिलेवर मृत्यूपूर्वी आणि नंतर अत्याचार झाल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर तपासामध्ये पोलिसांना एका व्यक्तीबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी या संशयिताबद्दल संपूर्ण तपास केला. त्यानंतर श्वान पथकाच्या मदतीनं पोलिस संबंधित संशयित आरोपीपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

 
आरोपी हा मृत वृद्ध महिलेचा शेजारीच होता. या संदर्भात तपासादरम्यान पोलिसांनी इतर शेजाऱ्यांकडून माहिती घेतली त्यावेळी, त्यांनीही संशयित व्यक्ती हा सोमवारी हत्या झालेल्या वृद्ध महिलेच्या घराजवळ आढळल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीला विचारपूस केली त्यावेळी त्यानं या प्रकरणामध्ये त्याचा सहभाग असल्याचं मान्य केलं.

 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही वृद्ध महिला घरी एकटी असल्याची माहिती संशयिताला होती. त्यामुळं सोमवारी आरोपी महिलेच्या घरात शिरला. त्यानंतर त्यानं महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं त्याला विरोध केला. त्यामुळं त्यानं या महिलेची हत्या केली. पण आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. महिलेची हत्या केल्यानंतरही त्यानं पार्थिवावर देखिल अत्याचार केला. त्यानंतर त्यानं तिथून पळ काढला होता. हत्येच्या या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांच्या आत यश आल्याचं पाहायला मिळालं आहे.

Post a Comment

0 Comments