महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचे पंतप्रधानांकडून कौतुक!


कोरोनाची दुसरी लाट देशभर थैमान घालत आहे. मात्र, याचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. दर दिवशी ६० हजारांच्या घरात रुग्णवाढ होत असताना राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. परिस्थिती किंचितशी सुधारलेली असली तरी, अगदी समाधानकारक नाही. १५ मे पर्यंत राज्यभर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. १५ मे नंतर काय निर्णय होतो हे परिस्थिती ठरवेल. 

केंद्र आणि राज्य सरकार यांत लसी, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा करण्यावरून वाद निर्माण झाले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी टीका आणि राजकारण दुर्लक्षित करून काम करायचे असल्याचे सूचक वक्तव्य सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले होते.

  महाराष्ट्रात भाजप नेते राज्य सरकारच्या कोरोना प्रतिबंध नियमांवर, योजनेवर टीका करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले आहे.  पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनद्वारे चर्चा झाली. यात मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेसाठी सुरू असलेली तयारी, आतापर्यंत केलेल्या उपाययोजना याची माहिती त्यांना दिली. 

महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने कोरोनाच्या लढाईत अडचणींचा मुकाबला करत मार्ग काढत आहे, हे पंतप्रधानांनी मान्य केले. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. 

 परदेशातून लस आयात करण्याची परवानगी मिळावी या मागणीसह; केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत महाराष्ट्र मार्गक्रमण करत आलेला आहे, असेच पुढेही मार्गदर्शन लाभावे असेही उद्धव ठाकरे बोलले.

Post a Comment

0 Comments