बार्शी! कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी खुली केली मस्जिद ; माणुसकीचा हाच धर्म जपणारे बार्शीकर


बार्शी/प्रतिनिधी:

 तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बार्शीत कोरोना विषाणूने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. येथील सर्वच प्रमुख दवाखाने कोविडसाठी आरक्षित केले असून हजारो रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांची प्रामुख्याने राहण्याची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बार्शी शिवसेना आणि बागवान मक्का मस्जिद पुढे आली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात माणूसकी हाच धर्म बार्शीने देशाला दाखवून दिलाय.

बार्शी तालुका शिवसेना आणि बागवान मक्का मशिदीने पुढे येऊन या मस्जिदमध्ये नातेवाईकांच्या राहण्यासाठी १०० बेडची सोय केली आहे. १ मे महाराष्ट्र दिनापासून ही सेवा सुरू होत आहे. बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर व बागवान मक्का मदीनाचे सर्व विश्वस्त यांनी  चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

 या मस्जिदमध्ये बार्शी शहर तालुक्याच्या बाहेरील भूम,  परांडा, उस्मानाबाद,  जामखेड खर्डा, अहमदनगर,  पुणे, मोहोळ,  करमाळा येथील कोविड पेशंटच्या १०० स्त्री-पुरुष नातेवाईकांची मोफत राहण्याची आणि उत्तम जेवणाची सोय करण्यात शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वच नेते आता मैदानात उतरले आहेत.   कोरोनाला ठरवायची जिद्दच बार्शीकरांमध्ये निर्माण झालीय, त्याचंच धर्माच्या भिंती तोडणारं हे आदर्शवत उदाहरण आहे.

Post a Comment

0 Comments