देशात करोनाची रुग्णसंख्या आणि त्यापाठोपाठ करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना धीर देतानाच करोनासाठी देश पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी देखील माहिती दिली. “सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक करतो. तुम्ही करोनाच्या पहिल्या लाटेत देखील आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं होतं. आज तुम्ही पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तरच आपल्याला विजय मिळू शकेल”, असं मोदी यावेळी म्हणाले.
देशातील काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडू लागला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याविषयी बोलताना “करोना काळात देशाच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे. सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत”, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
“यावेळी करोनाचे रुग्ण वाढताच देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज देशातली सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले”, असं म्हणत मोदींनी देशातील संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं कौतुक केलं.
0 Comments