शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी ; सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी २६ जणांवर गुन्हा दाखल


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करुन बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे . आरोपींनी सोशल मीडियावर बनावट अकाऊंटवरुन शरद पवार यांची बदनामी करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली . याप्रकरणी २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत घडला आहे. 

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे ( वय -३४  रा . पिंपळे निलख , पुणे ) यांनी नोडल सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे फिर्याद दिली आहे. वरपे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.


फेसबुक पेज सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब पोस्टेड बाय धनंजय जोशी, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय अतुल अयचित, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय सोनाली राणे,  भाजप सोशल मीडिया वॉर रुम महाराष्ट्र पोस्टेड बाय मधुकर वाघमारे, टकलु हैवान, देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेज चालवणाऱ्या व्यक्ती तसेच फेसबुक अकाउंटधारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वंबर देव, गोविंद कुलकर्णी धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस . जोशी, नाना पंडीत, राम शिंदे पाटील, शिशिकांत आहिरे, राधा माने, सोनाली राणे, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड आणि ट्विटर अकाऊंट धारक रुद्र देव, विमुक्त आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट , ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह , हिणकस , विकृत , बदनामीकारक लिखाण केले . तसेच सोशल मीडियावरुन शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली . असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे . पुढील तपास पोलीस करीत आहेत .

 

Post a Comment

0 Comments