पंढरपूर/प्रतिनिधी: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक निर्भय , नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १ लाख ७८ हजार १९० पुरुष मतदार व १ लाख ६२ हजार ६९४ स्त्री मतदार तसेच इतर ५ असे एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार आहेत. मतदारसंघात ५२४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यामध्ये ३२८ मूळ मतदान केंद्र १९६ सहाय्यक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी ५२४ कंट्रोल युनिट, १०४८ बॅलेट युनिट व ५२४ व्हीहीपॅट मशीन असणार आहेत. तसेच २१० कंट्रोल युनिट, ४२० बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी २५५२ अधिकारी - कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी ९४ एसटी बसेस व तीन जीपची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा बीज पुरवठा, शौचालय, दिव्यांगासाठी रॅमची सुविधा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी दिली.
0 Comments