सोलापूर/प्रतिनिधी: कोरोना वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात तर शहरात महापालिका आयुक्तांनी मिनी लॉकडाऊन म्हणून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याअंतर्गत मद्यविक्री पूर्णपणे बंद असून रेस्टॉरंटदेखील बंद आहेत. यात मद्यपींची मोठी पंचाईत होत आहे. त्यांना हा दारुचा विरह सहन होत नाही.
३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असून पुढील परिस्थिती पाहून शिथिलतेचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील एका रेस्टॉरंटमध्ये घुसून चोरट्याने पाच हजार १०० रूपयांची दारू पळवून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी (ता. ७) सकाळी दहा या वेळेत घडली आहे.
होटगी रोडवर पुष्कर बार ऍण्ड रेस्टॉरंट आहे. मिनी लॉकडाऊनमुळे दोन दिवसांपासून बंदच आहे. चोरट्याने ही संधी साधली आणि मंगळवारच्या मध्यरात्री तो चक्क खिडकीतून रेस्टॉरंटमध्ये घुसला. त्यानंतर त्याने रेस्टॉरंटमधील पाच हजार १०० रुपयांची दारू चोरली. तसेच हॉटेलमधील साडेचार हजार रुपये, पाच हजारांचा संगणक चोरून नेला.
यात दीपक रामचंद्र मोरे (रा. विजयनगर, नई जिंदगी रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. चोरट्याने रेस्टॉरंटचा मागील दरवाजा उचकटला. त्यानंतर वॉल कंपाउंडवर चढून खिडकीतून आत प्रवेश केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या चोरट्याचा शोध पोलिस हवालदार घुगे हे घेत आहेत.
0 Comments