"उजणी धरणांमधलं सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे १ थेंबही पाणी इतरत्र वळवू देणार नाही" आमदार संजय शिंदे सोशल मीडियावर झाले आक्रमक



कुर्डूवाडी/प्रतिनिधी: 

उजनीचे सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला वळवण्यावरुन सध्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंवर सर्वत्र टीका होत आहे. अशात आता सोलापूरचे प्रतिनिधीही आक्रमक होऊ लागले आहेत. उजनी पाणी प्रश्नावर पेटलेल्या रणकंदनावर आमदार संजय शिंदे यांनी सोशलमीडियावर पोस्ट करुन अखेर आपले मौन सोडले आहे. विशेष मात्र यात पालकमंत्र्यांचा उल्लेख केला नाही.

उजनीच्या ५ टीएमसी पाण्यासंदर्भात मी जाहीरपणे सांगतो, जर चुकीच्या पद्धतीने काही घडल्यास मी सोलापूर जिल्हा वासीयांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढेन, गरज पडल्यास मी माझ्या मतदारसंघासाठी व जिल्ह्यातील जनतेसाठी सर्वस्व पणाला लावेन, पण उजणी धरणांमधलं सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे १ थेंबही पाणी इतरत्र वळवू देणार नाही, अशा आशयाची पोस्ट करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी व्हायरल केली आहे. ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.


पोस्टमध्ये शिंदे यांनी अकलूजच्या मोहिते – पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ते म्हणालेत की माझ्या नेत्यांच्या संबंधित विरोधक व काही खोडसाळ पत्रकार नेहमी गैरसमज व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, माझे नेते अजितदादा पवार व पवार कुटुंबीय यांच्यासंदर्भात माझ्या जीवनात असाधारण महत्त्व आहे. आणि ते मी हृदयात जपलंय, त्याचा इतरांच्या सारखा बाजार कधीच मांडला नाही, त्या भांडवलावर कधीच कुठलं पद मिळवले नाही वा कोणत्याही संस्था वाचवण्यासाठी त्याचा वापर केला नाही.

जेव्हा कधी वेळ आली तेव्हा इतर नेत्यांसारखा पळ सुध्दा काढला नाही, शेवटच्या क्षणी नेत्यांनी जो आदेश दिला तो मी पाळला आहे. भलेही त्यात माझा राजकीय नफा – तोटा झाला असेल, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments