आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं, उपराष्ट्रपतींचं आवाहन



नवी दिल्ली : आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. सद्यस्थितीत कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विचारमंथन करताना नायडू बोलत होते.  

या परिस्थितीला अधिक प्रभावीपणे तोंड देण्यासाठी नवी रणनीती तयार करण्याच्या दृष्टीनं राज्यपाल मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करू शकतील. तसंच या परिस्थितीत जनतेचं मनोधैर्य उंचावणं आणि या आपत्तीतून बाहेर पाडण्यासाठी जे प्रयत्न विविध पातळ्यांवर सुरु आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना सहकार्य करून अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचविणं यामध्ये राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असंही नायडू यांनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याप्रसंगी राज्यपालांसोबत संवाद साधला. देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सर्वाधिक वेगानं दहा कोटी लोकांचं लसीकरण करणारा भारत हा एकमेव देश असून टीका उत्सवाच्या काळात या अभियानाला वेग मिळाला, असं मोदी म्हणाले. यापुढील काळात लसीकरण आणि उपचार याबाबत जनजागृती करतानाच आयुषसंबंधीच्या उपचारांबाबतही राज्यपाल जनतेला माहिती देऊन जागृती करू शकतील, असं मोदी म्हणाले.

Post a Comment

0 Comments