सोलापूर! महिला, सर्वसाधारण हॉस्पिटलच्या कामास आवश्यक निधी देऊ ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहितीसोलापूर/प्रतिनिधी : सोलापुरातील महिला हॉस्पिटल आणि सर्वसाधारण हॉस्पिटलच्या कामांस गती द्या. त्यासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितले.

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भरणे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी सुरुवातीला शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. त्याचबरोबर सोलापुरातील गुरुनानक चौकात उभारण्यात येत असलेल्या महिला हॉस्पिटल आणि सर्वसाधारण हॉस्पिटलच्या कामाचा आढावा घेतला. या दोन्ही हॉस्पिटलच्या उभारणीच्या कामास गती द्यावी. त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देऊ, असे श्री. भरणे यांनी सांगितले. आणखी लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर प्रस्ताव तत्काळ तयार करून द्यावा, अशी सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे यांना केली.

करमाळा, पंढरपूर, माळशिरस आणि माढा या तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यातील निर्बंध काटेकोर करावेत. गर्दी होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोरोनाच्या चाचण्या आणि संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्यात, असे श्री. भरणे यांनी सांगितले.

खासगी कोविड केअर सेंटरला परवानगी देण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ग्रामीण भागातील विविध गावात सुरु करण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवा, अशा सूचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिल्या. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी नियोजन करा. राज्य शासनाकडून जास्तीत जास्त लस मिळवण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना उद्या प्रातिनिधिक स्वरूपात शहरात एका तर ग्रामीण भागात चार ठिकाणी लस दिली जाणार आहे, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

बैठकीस उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, अनिल कारंडे, सुप्रिया डांगे, परिवहन अधिकारी सतीश जाधव, अर्चना गायकवाड, शिक्षणाधिकारी संजय राठोड, भास्करराव बाबर, जावेद शेख आयएमएचे निनाद शहा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments