बार्शी! कोरोनाला हरवत व किराणा दुकान सांभाळत अश्विनीने पटकावला गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक....


बार्शी/प्रतिनिधी:

मळेगाव ता.बार्शी. सोलापूर : बार्शी तालुक्‍यातील गौडगावची कन्या व श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगरची विद्यार्थिनी अश्विनी सहदेव कणेकर हिने गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावत देदीप्यमान कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

अश्विनीच्या या यशाने "बार्शी तिथे सरशी' हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अश्विनी कणेकरने गेट - २०२१ परीक्षेत ७९.६७ टक्के गुणांसह बाजी मारली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत आठ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १७ टक्के रिझल्ट लागला असून, अश्विनी कणेकर हिने १००० पैकी ९४५ गुण मिळवत टेक्‍स्टाईल विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

गौडगाव ता. बार्शी येथे जन्मलेल्या अश्विनीने प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगर, पुणे येथे पूर्ण केले. डीकेटी शिक्षण संस्था, इचलकरंजी येथे गेट परीक्षेची तयारी करीत तिने हे उज्ज्वल यश संपादन केले आहे. श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगर येथे आई-वडिलांसोबत तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप, प्राचार्य एच. डी. मोरे, उपप्राचार्य एस. एस. तिकटे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments