रणजीत पाटील/परंडा: - जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवसेना पक्षाच्या वतीने १२५ बेड्सचे अद्ययावत जम्बो कोविड सेंटर लवकरच जनतेच्या सेवेत येणार असल्याची माहिती खा. ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. शिवसेनेचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेकरिता अधिक बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी धाराशिव (उस्मानाबाद) येथे कोरोना बाधित रुग्णांसाठी शिवसेना, पवनराजे फाउंडेशन, नगरपालिका उस्मानाबाद व IMA च्या संयुक्त विद्यमानाने समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव (उस्मानाबाद) येथे १२५ बेड चे कोविड सेंटर सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यापैकी ५० बेड ना ऑक्सिजनची सुविधा देण्यात येणार आहेत. उत्तम आरोग्य व्यवस्था, तज्ञ डॉक्टर्स आदी सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत.
शिवसेना, पवनराजे फाऊंडेशन, नगरपरिषद उस्मानाबाद व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव(उस्मानाबाद) येथे कोरोनाच्या संकटात संकटग्रस्त रुग्णांच्या आरोग्य सेवेकरिता वैशिष्ट्य पूर्ण व नाविन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेडची व्यवस्था असलेले जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद(धाराशिव) जिल्ह्यात रोज कोविड रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांना तसेच नातेवाईकांना ऑक्सिजनयुक्त बेड, सामान्य बेड मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, सध्या वाढत्या रुग्ण संख्येने शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात ही बेडची कमतरता भासत असल्याने त्यावर मात करण्यासाठी हे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत असून लवकरच सर्व सुविधांनी कार्यरत होणार आहे.
रुग्णांना योग्य उपचार देणे व कोरोनाचा फैलाव थांबवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. अशी विनंती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी नागरिकांना केली.
0 Comments