प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
जयसिंगपूर कॉलेज नेहमीच अनोख्या वेगवेगळ्या उपक्रमानी प्रसारमाध्यमांमध्ये परिचयाचे झाले आहे. असाच एक अनोखा उपक्रम मेहबूब मुजावर या माजी विद्यार्थ्यांनी करून दाखवला आहे. त्याच्या या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मेहबूब या नावाने पूर्ण कॉलेजला सुपरिचित असलेले एक विद्यार्थीरुपी व्यक्तिमत्व होय. हे व्यक्तिमत्त्व अनोखे असून फक्त चांगल्या व सेवाभावी कामासाठी परिचयाचे आहे. एम.ए.अर्थशास्त्रात पदवी संपादन करून हा फक्त विद्यार्थी,कॉलेज व समाजासाठी सातत्याने अविरतपणे झटणारा हा अवलिया माजी विद्यार्थी मेहबूब मुजावर होय. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती त्यासाठी रात्री पेट्रोल पंपावर काम करून शिक्षण संपादन करणारा हा मुलगा सातत्याने जगण्यासाठी व अस्तित्वासाठी धडपडत असतो. कॉलेजच्या कोणत्याही घटकाकडून काही अडचण असेल तर महबूबला कामासाठी बोलविले जाते.त्याचं सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही कामासाठी तो कधीही नकार देत नसतो त्यामुळे सातत्याने काम सांगणाऱ्या व्यक्तीला आपण त्याची पिळवणूक तर करत नाही ना असं वाटायला लागते.तो कोणत्याही विभागाचे काम प्रामाणिकपणे व जबाबदारीने पूर्ण करीत असतो. त्यामुळे कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून तो परिचयाचा झाला आहे.
विद्यार्थिदशेत असताना सातत्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी व कॉलेज हितासाठी झटत होता परंतु २०२० मध्ये कोरोना काळात अर्थशास्त्रातील पदवीत्तर पदवी संपादन केल्यानंतर स्वतःचं करिअर करण्याचा प्रयत्न करीत असताना मात्र कोरोनाच्या काळात सर्वत्र शाळा व महाविद्यालय बंद असताना स्वतः वरिष्ठांशी परवानगी घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या उदात्त भावनेने ऑनलाइन लेक्चरचे वर्ग सुरु केले. त्यावेळी हा मुलगा निस्वार्थी भावनेने व विना मोबदला अध्यापनाचे काम करीत होता. त्याच दरम्यान कॉलेज सुरू असताना तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे अजून भरती नसल्यामुळे अशा वेळेला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अर्थशास्त्र विषयाच्या वर्गाचे सलग २ महिने अध्यापनाचे काम पूर्ण केले.नोकरी मिळेल किंवा काही तरी मिळेल अशी अपेक्षा न बाळगता तो काम करीत होता. त्यामुळे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन सेवेचे कार्य प्रामाणिक व चोखपणे पार पाडले. त्यामुळे अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय शिक्षक बनला. कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांचे काम विनासायास सोपे व्हावे यासाठी सहकार्य करत असतो.
कोरोनाच्या काळात स्वखर्चाने ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून श्रीमंताला ही लाजवेल अशा प्रकारचे काम केले आहे परंतु याची खबर किंवा मार्केटिंग केले नाही.तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे टॅग लक्षात ठेवून विद्यार्थ्यांना तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, हातांना सॅनिटायझर लावणे या सारखे प्रबोधनाचे काम तो सातत्याने करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेचा माजी स्वयंसेवक विद्यार्थी म्हणून कॉलेजमधील विद्यार्थी,प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक यांचे थर्मल तपासणी,ऑक्सिजन पातळी मोजणे यासारखी कामे स्वच्छेने करीत असतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे मनोभावे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व उपक्रमामध्ये सहभागी होऊन नृसिंहवाडी येथील कोरोना काळातील तपासणी, स्वच्छता अभियान व महात्मा गांधी पुण्यतिथी प्रबोधन या प्रत्येक कामात हिरीरीने सहभागी होऊन समाज सेवा करणे हा त्याचा पिंड बनला आहे. तो मान-अपमान याचा कधीही विचार न करता या नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून सामाजिक बांधिलकी व संवेदनशीतेच्या भावनेतून सातत्याने सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करीत असतो.
खरंच इतक्या कमी वयात एवढी परिपक्वता ही देशाच्या एका प्रामाणिक व सच्चा नागरिकाला शोभून दिसणारी आहे असेच काही महबूब मुजावर यांच्या विषयी बोलणे योग्य आहे. आजच्या काळात एका बाजूला भरकटलेली तरुणाई दिसते त्याला अपवाद मेहबूब मुजावर सारखा तरुण दिसतो.
त्याला हे सर्व काम करण्याची प्रेरणा त्याच्या आईरुपी माऊली, गुरुजन व राष्ट्रीय सेवा योजनेकडून मिळाली आहे. शेवटी सलाम या माजी विद्यार्थ्यांच्या कार्याला व विचारांना ज्याच्याकडून इतरांनी आदर्श घ्यावा.
2 Comments
Nice
ReplyDeleteGood job bhayi congratulations 👏
ReplyDelete