तरुणीला लग्नासाठी वारंवार टॉर्चर करून तिची नातेवाईकांमध्ये बदनामी केली. तिला फोनवरून धमकावून तिचे जगणे असह्य केले. यातूनच तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतीत तरुणीने तिच्या मोबाईलमध्ये चिठ्ठीवजा मजकूर टाईप करून ठेवला आहे. मयत तरुणीचा भाऊ ऋतिक ज्ञानेश्वर कोकणे (वय २१, रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. २७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अजिंक्य जालिंदर साठे (वय २५), जालिंदर साठे (वय ५५), छाया जालिंदर साठे (वय ४९, तिघे रा. पिंपळे सौदागर), कृष्णा उमाजी बुचडे, ज्ञानेश्वरी कृष्णा बुचडे (दोघे रा.मारुंजीगाव, ता. मुळशी), रामेश्वरी आकाश माने (रा. वेहेरगाव, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मयत बहिणीला वेळोवेळी लग्नासाठी टॉर्चर केले.
लग्न करण्यासाठी तरुणी तयार न झाल्याने आरोपींनी तरुणीची पाहुण्यांमध्ये बदनामी केली. तरुणीचे व्हाट्सएप, इंस्टाग्राम, फेसबुकवर बदनामीकारक फोटो टाकून तिला फोनवरून धमकावले. या त्रासाला कंटाळून तरुणीने सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राहत्या घराच्या बेडरूममधील फॅनच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा मजकूर पोलिसांच्या हाती लागला असून त्यावरून आरोपींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments