पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात १५ दिवसांच्या टाळेबंदीचा कालचा पहिला दिवस होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा सध्याची दुसरी लाट अधिक गंभीर असली तरी लोकांना अजून परिस्थितीचं गांभिर्य कळलेलं दिसत नाही.
संपूर्ण राज्यात टाळेबंदी आहे, गावोगाव नाकाबंदी करण्यात आली आहे, चोख पोलीस बंदोबस्तही आहे, कारवाईही होते आहे पण तरीही लोक निर्बंध धुडकावताना दिसतात. धुळ्यात भाज्या, फळं विक्रेते, रिक्षाचालक, गर्दी करणारे नागरिक हे नेहमीचेच दृश्य काळी दिसले. मनपा आयुक्त अजिज शेख यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील विविध भागातील भाजी आणि फळ विक्रेत्यांसाठी जागा निश्चित केल्या होत्या. आणि सर्वांना मंगळवारपासून नवीन जागेवर थांबण्याचे आदेश दिले हेाते. मात्र, अद्यापही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही,
जालना, बुलडाणा जिल्ह्यात दुकानं बंद असली तरी पोलीस आणि प्रशासनाच्या आवाहनाला धुडकावून नागरिक काल विविध कारणांनी रस्त्यावर दिसत होते. जळगाव आणि भुसावळ शहरात रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरणाऱ्यांची तिथेच अँटीजेन चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या निर्देशानुसार पालिकेतले वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्यानं ही चाचणी केली जात आहे. जळगाव शहरात दुकानं उशीरापर्यंत उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर तसंच आंबेडकर जयंती निमित्त आदेश धुडकावून मोटरसायकल रॅली काढणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
रत्नागिरीमध्येही रस्त्यावर कारणाशिवाय फिरणाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. अमरावती मध्ये संचारबंदीचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. उलट रस्त्यांवर नागरिकांची अधिकच वर्दळ दिसली. दुकानदार, फेरीवाले, रिक्षा वाहतूक नेहमीप्रमाणे पूर्ण गर्दीत सुरु होती. कवळ मास्क न लावणाऱ्यांवर पोलीस कारवाई करताना दिसले.
यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचं काटेकोर पालन व्हावं यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासनानं ८१ नाकाबंदी पॉईंट ठरविले असून याठिकाणी अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता पोलिसांसोबतच शिक्षकांची देखील नियुक्ती केल्या जाणार आहे. रायगड आणि साताऱ्यात मात्र बाजारपेठा रस्ते ओस पडले आहेत. सिंधुदुर्गमध्येही संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी रिक्षा वाहतूक मात्र सुरु आहे. जिल्ह्यात एस टी सेवा अंशत: सुरु आहे.
0 Comments