पहिल्या वनडेत भारताचा दमदार विजय


इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव केला. या विजयासोबत भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर ३१८ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २५१ धावाच करू शकला.

याबरोबरच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे होत असलेल्या तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारताने १-० अशी आघाडी देखील घेतली आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला ४१.१ षटकात सर्वबाद २५१ धावा करता आल्या. भारताकडून पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

भारताने दिलेल्या ३१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी दिमाखात सुरुवात केली होती. त्यांनी १३५ धावांची सलामी भागीदारी रचली. मात्र रॉयला ४६ आणि अष्टपैलू बेन स्टोक्सला १ धावेवर बाद करत प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडला मोठे धक्के दिले.

त्यानंतर मात्र इंग्लंडने नियमित अंतराने विकेट्स गमवायला सुरुवात केली. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने केवळ एकाकी झुंज दिली. त्याने ९४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. मात्र त्याला शार्दुल ठाकूरने बाद करत भारताच्या मार्गातील अडथळा दुर केला.

त्याच्यापाठोपाठ शार्दुलने एकाच षटकात कर्णधार ओएन मॉर्गन आणि जॉस बटलर यांना बाद करत भारताचा विजयाचा मार्ग आणखी सुखर केला. त्यानंतर मोईन अली आणि सॅम बिलिंग्सने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण अलीला भुवनेश्वर आणि बिलिंग्सला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. त्यानंतर सॅम करन आणि आदिल राशिद देखील स्वस्तात बाद झाले.

गोलंदाजी करताना भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने ३ विकेट्स, भुवनेश्वर कुमारने २ आणि कृणाल पंड्याने १ विकेट घेतली.
तत्पूर्वी या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित २८ धावा करुन बाद झाला. पण यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखरला चांगली साथ दिली.

विराट आणि शिखर यांच्यात शतकी भागीदारी झाली. ही भागीदारी रंगत असतानाच विराट ५६ धावा करुन मार्क वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल मोईन अलीने घेतला. त्यामुळे शिखर आणि विराटमधील १०५ धावांची भागीदारी तुटली. विराट पाठोपाठ काही वेळात श्रेयस अय्यर देखील ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर काहीवेळातच शिखरही ९८ धावा करुन बाद झाला. त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले.

शिखरनंतर हार्दिक पंड्यानेही केवळ १ धावेवर विकेट गमावली. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि कृणाल पंड्याने नाबाद अर्धशतके झळकावत भारताला ३०० धावांच्या पार नेले. कृणालने या सामन्यातून पदार्पण केले आहे. पदार्पणातच त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावले.

भारताच्या डावातील ५० षटके संपली तेव्हा केएल राहुल ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावांवर आणि कृणाल पंड्या ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने ५० षटकात ५ बाद ३१७ धावा केल्या आणि इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ३ आणि मार्क वूडने १ विकेट घेतली.

Post a Comment

0 Comments