कोल्हापूर/प्रतिनिधी:
गोकूळ दूध हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नावाजलेला संघ आहे. सहकारी तत्त्वावर चालणारी ही सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेवर निवडून जाण्याचे अनेक कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे स्वप्न असतं. त्यासाठी ते अनेक लटपटी, खटपटी करीत असतात. या वर्षीच्या निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी झालीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भूमिका पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीत कायम महत्त्वाची राहिलीय. केवळ निवडणुकीत मिरवणाऱ्यांचा त्यांना राग आहे. इच्छुकांची झुंबड पाहून त्यांनी एक विधान केलंय. तेच सध्या चर्चेचा विषय ठरतंय.
सध्या गोकुळ दूध संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी महाडिक यांची सत्ता हिरावण्याची तजवीज सुरू केलीय. कोणत्याही स्थितीत गोकूळव झेंडा फडकावण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी सर्व काही फिल्डिंग त्यांनी लावली आहे. महाडिक कोणत्याही स्थितीत हा दूध संघ ताब्यातून जाऊ देण्याच्या मानसिकतेत नाहीत.
सहकारातील धुरीण राजू शेट्टी यांची महादेव महाडिक यांनी भेट घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत राहण्यासाठी गळ घातली आहे. राजू शेट्टी यांच्यासारखा खंदा नेता सोबत असेल तर गोकूळवर सत्ता आपलीच, असं महाडिक यांना वाटतं आहे. कारण गेल्या २५ वर्षांपासून त्यांचीच एकहाती सत्ता आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्या सत्तेला सुरूंग लावण्याची रणनीती आखली आहे. मागील निवडणुकीत सतेज पाटलांची संधी हुकली होती. यंदा ही संधी साधायचीच असा त्यांचा मानस आहे. या निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज उतरल्याने त्यात रंग भरले आहेत.
निवडणूक लढविताना आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो, याचं थोडं तरी नॉलेज किंवा माहिती हवी, असं शेट्टी यांचं म्हणणं आहे. त्यातून त्यांनी इच्छुकांना एक चॅलेंज दिलंय, न थकता दहा लिटर दूध काढून दाखवा आणि नंतरच अर्ज भरा. हे विधान गमतीचं वाटत असलं तरी त्यात तथ्य आहेच.
0 Comments