शासन निर्देशानुसार महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरात इयत्ता पाचवी ते बारावीचे खासगी कोचिंग क्लासेस मधील शिकवणी वर्ग सुरु करण्यास सोमवार दि.१५ फेबुवारी पासून परवानगी दिली आहे. कोचिंग क्लास सुरु करण्यापूर्वी प्रत्येक क्लासमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी करून घेण्याची सक्ती मात्र करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम असल्याने आजवर पालिकेने खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र आता शासन निर्देशानुसार पालिकेने इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांचे क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आयुक्त पांडेय यांनी याविषयी सोमवारी आदेश जारी केले असून त्यात म्हटले आहे की, इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे शालेय वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, त्यानुसार हे वर्ग शाळांमधून सुरु झाले आहेत. कोरोनासाठीच्या अटी-शर्तींचे पालन करुन हे वर्ग सुरु झाले आहेत. आता याच धर्तीवर इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे खासगी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. खासगी कोचिंग क्लास सुरु करण्यापूर्वी क्लासमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. कोरोनाविषयीच्या अटी व शर्तींचे पालन न करणार्या क्लासमधील वर्ग तात्काळ बंद केले जातील, असा इशारा देखील आदेशात दिला आहे.
पालकांची संमती घेणे अनिवार्य : कोरोनाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन प्रत्येक क्लासेसच्या संचालकाला करावे लागेल. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून लेखी संमत घेणे गरजेचे आहे. तसेच पालिकेने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे व सूचनांचे पालन करणे कोचिंग क्लासेसच्या संचालकाला बंधनकारक असेल.
नियमांचे पालन न केल्यास कारवाई : शासनाचे आदेश व सूचनांचे पालन न करणार्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई तर केली जाईलच. सोबतच अपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५१ ते ६० च्या तरतूदीनुसार देखील कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पालिका आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
0 Comments