दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर अनेकांनी आपापली मते व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिनेदेखील शेतकरी आंदोलनावर मत व्यक्त केले. त्यानंतर, देशातील दिग्गज मंडळींनी तिला झिडकारत देशाच्या सार्वभौमत्वावर एकवाक्यता दाखवली.
हे सगळे लोक भाजपच्या आणि केंद्र सरकारच्या दबावाने बोलले, असे विरोधकांचे म्हणणे होते. या दिग्गजांमध्ये सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांची देखील नावे होती. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याबद्दल चौकशी व्हावी, असे गृहमंत्र्यांकडे मागणे केले होते. त्यावर गृहमंत्र्यांनी ट्विटची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन देखील दिले होते.
गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर निषेध नोंदवला होता. भारतरत्नाची चौकशी करणे म्हणजे, अगदी चुकीचे असल्याचे आणि "आता मराठी बाणा कुठे गेला?" असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न देखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता.
आता यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना प्रत्येक जण खूप मानतो. त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकरणात भाजपची आयटी सेल असल्याचा अंदाज आहे, आणि त्याविषयी तपास करण्याचे आदेश दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले."
0 Comments