'रवी पुजारी' अखेर मुंबई पोलिसांच्या कचाट्यात; तब्बल इतक्या गुन्ह्यांत सूत्रधार


 
 दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळविण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. बंगळुरू येथील न्यायालयाने कोठडी मंजूर केल्यामुळे गुन्हे शाखेचे पथक कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेऊन त्याला सोमवारी मुंबईत आणणार आहेत. 

तब्बल 'एवढे' गुन्हे दाखल-

 रवी पुजारीवर मुंबईत सुमारे ४९ गुन्हे दाखल असून अनेक बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना त्याने खंडणीसाठी धमकावले आहे. त्याचा ताबा मिळाल्याने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
(Advertise)

 रवी पुजारी हा दक्षिण आफिका येथील सेनेगल पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. दोन वर्षांपूर्वी त्याला भारतामध्ये आणण्यात आले. 

 सुमारे ९० पेक्षा अधिक गुन्हे कर्नाटकमध्ये दाखल असल्याने त्याचा ताबा प्रथम कर्नाटक पोलिसांना देण्यात आला. रवी पुजारी याच्याविरोधात मुंबईत सुमारे ४९ गुन्हे दाखल असून त्यापैकी 26 गुन्ह्यांमध्ये 'मोक्का' लावण्यात आला आहे. आता न्यायालयाची परवानगी मिळाल्याने सोमवारीच पुजारीला मुंबईत आणले जाणार हे स्पष्ट झाले आहे.

कोण आहे रवी पुजारी?

रवी पुजारी हा मूळचा कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील मालपे येथील असून १९९० मध्ये त्याने गँगस्टर छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:ची गुन्हेगारी टोळी बनवली. पुजारी याने मुंबई, बंगळुरू आणि मँगलोर येथे वेगवेगळया क्षेत्रातील व्यावसायिक, बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी धमकावले व हस्तकांमार्फत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करून आपल्या टोळीची दहशत निर्माण केली.

Post a Comment

0 Comments