स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच महिलेला देणार फाशी


 स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगामध्ये मूळची अमरोहा येथे असणाऱ्या शबनमला फासावर लटकवण्यात येणार आहे. शबनमला फाशी देण्यासंदर्भातील तयारी तुरुंग प्रशासनाने सुरु केली आहे. फाशीची तारीख निश्चित करण्यात आलेली नसली तरी तुरुंग प्रशासनाच्या तयारी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान नातेवाईकांनी फाशी झाल्यावर शबनमचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने २००८ साली प्रियकर सलीमच्या मदतीने  स्वत:च्या सात नातेवाईकांच्या जेवणामध्ये गुंगीचे औषध घातले होते. त्यानंतर नातेवाईक बेशुद्ध पडल्यानंतर त्यांची कुर्‍हाडीने वार करून हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबनमला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे शबनमला फाशी होणार हे निश्चित झाले आहे.

अमरोहामधील हसनपूरजवळ असणाऱ्या बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने सलीमच्या मदतीने २००८ साली १४ आणि १५ एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील सात जणांची हत्या केली. यामध्ये शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या सहा जणांना समावेश होता. शबनमने नंतर आपल्या लहान भाच्याला गळा आवळून मारुन टाकलं. सलीमसोबत असणाऱ्या आपल्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध असल्याने शबनमने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.

Post a Comment

0 Comments