पती सैन्यदलातून देशसेवेत तर, सरपंच पत्नी गावाच्या सेवेत


माढा/प्रतिनिधी: 

भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जाधववाडीचे जवान अमर चवरे यांच्या पत्नी पल्लवी चवरे यांनी गावचे सरपंच पद पटकावले आहे. तर, उपसरपंचपदी आशा विकास पवार यांची वर्णी लागली आहे.

जवान अमर चवरे हे पठाणकोट (पंजाब) येथील सीमेवर देशसेवेत असून त्यांच्या पल्लवी चवरे या सरपंचपदावरून गाव विकासासाठी ग्रामस्थांच्या सेवेला तत्पर झाल्या आहेत. जाधवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे गटाच्या अमोल चवरे यांच्या पॅनलने चार जागा काबीज करून विजय खेचून आणला. तर, विरोधी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. सरपंच-उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली. स्मार्ट ग्रामची निर्मिती करीत मुलभूत सुविधांची प्राधान्याने पूर्तता करणार असल्याचे सरपंचपदी निवड झाल्यानंतर बोलताना पल्लवी चवरे यांनी सांगितले.


'माझे पती देशाच्या सेवेत असून ते पंजाब येथे सीमेवर आहेत. गावाचे 'व्हिजन' घेऊनच मी निवडणुकीत उतरले होते. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेऊन प्रचंड मताधिक्याने विजयी तर केलेच. शिवाय, माझ्यावर सरपंच पदाची जबाबदारी दिली असून गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहीन,' अशी प्रतिक्रिया सरपंच पल्लवी चवरे (जाधववाडी, ता. माढा) यांनी दिली.

निवडीप्रसंगी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, नगरसेवक चंद्रशेखर गोटे, शहाजी चवरे, अमोल चवरे यांच्यासह डाॅ. प्रताप चवरे, बापूसाहेब जाधव, तुकाराम भाकरे, तानाजी पवार, हरिदास चवरे, वैभव चव्हाण, शुभम जाधव, दिनेश भाकरे, सुनिल कन्हेरे, साधू भाकरे, अंकुश जाधव, अर्जुन पवार, सौदागर कन्हेरे, सागर हांडे, शरद काटे, संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव, युवराज परांडे, अनिल शिंदे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर फटाके उडवून पेढे वाटत जल्लोष साजरा केला.

Post a Comment

0 Comments