"१५ फेब्रुवारीपासून ५०% रोटेशन पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व कॉलेजचे नियमित वर्ग सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदिल"



प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:

महाराष्ट्रातील सर्व कृषी  विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी, प्रविणकुमार पवार यांनी शासन परिपत्रकानुसार विद्यापीठांनीही आवश्यक ती कार्यवाही करून महाविद्यालय सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे.
        
कोव्हीड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात मार्च २०२० पासून लॉकडाउन  घोषित करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक संस्थांची घडी विस्कळीत झाली होती परंतु शासनाच्या प्रयत्नामुळे व लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे कोरोनाची साथ नियंत्रणात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे हित लक्षात घेऊन पुन्हा नव्याने शैक्षणिक घडी बसविण्यासाठी कोव्हीड-१९ चे प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील नियमित वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
       
त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२१/प्र. क्र. ६/विशी-३, मंत्रालय मुंबई निर्गमित केलेल्या दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ नुसार संबंधित विद्यापीठ हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येत असल्यामुळे त्यांच्याशी विचारविनिमय करून कोरोना आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव, स्थानिक परिस्थिती व आरोग्य विषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये सुरू करून नियमित वर्ग घेण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजनांची कार्यवाही संबंधित संस्थांकडून तात्काळ करण्यात यावी याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित विद्यापीठांनी स्थानिक प्राधिकरणाची सहमती घेऊन महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
      
यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ५ नोव्हेंबर २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून ५० % पर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्यात यावा तसेच दिनांक ५ मे २०२० रोजीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. त्याचबरोबर दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तनुसार सर्व संबंधित विद्यापीठांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा प्रकारचे आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कार्यासन अधिकारी प्रविणकुमार पवार यांनी परिपत्रक निर्गमित केले आहे.
     
शासनाच्या या नियमित वर्ग सुरू करण्याच्या आदेशामुळे सर्व विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शिक्षण तज्ञ, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी यांच्या कडून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments