सोसायटीच्या पार्किंगमध्ये पहाटे घडलं भयानक; सकाळी दृश्य बघून हादरलेच!पुण्यातील नऱ्हेगाव येथील भूमकर चौकाजवळील सोसायटीच्या पार्किंगमध्ये कार चोरी करण्यासाठी आलेल्या चौघांनी कार मालकाला चाकूने भोसकले. पहाटे ही घटना घडली होती. सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


 प्रमोद किसन घारे (वय ३५, रा. सिद्धी संकल्प सोसायटी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.रविवारी सुट्टी असल्याने ते त्यांच्या कुटुंबीयांसह खडकवासला येथे फिरण्यासाठी गेले. रात्री परत आल्यावर त्यांनी आपली कार पार्किंगमध्ये लावली. पहाटे पावणेचारच्या सुमारास प्रमोद यांना पार्किंगमध्ये कसला तरी आवाज आला. त्यामुळे त्यांना जाग आली.

त्यांनी गॅलरीत जाऊन खाली पाहिले असता, एक व्यक्ती त्यांच्या कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. त्यामुळे ते खाली गेले आणि त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी प्रमोद आणि त्या चोरट्यात झटापट सुरू झाली. ही झटापट सुरू असतानाच चोरट्याचे इतर तीन साथीदार सोसायटीच्या भिंतीवरून उड्या मारून सोसायटीत शिरले.

 या तिन्ही चोरट्यांनी प्रमोद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रमोद यांनी धाडसाने प्रतिकार केला असता, चौघांपैकी एका चोरट्याने प्रमोद यांच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर चोरटे भिंतीवरून उड्या मारून पळून गेले. या हल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रमोद जागेवरच कोसळले. त्यानंतर सुमारे दीड ते दोन तास प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात पडून होते.पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दमयंती ढकाल सोसायटीत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. ढकाल यांनी प्रमोद यांच्या पत्नीला आणि सोसायटीतील इतरांना या प्रकाराची माहिती दिली.सोसायटीतील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली; तसेच प्रमोद यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख, सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चोरट्यांचा माग काढला जात आहे.

Post a Comment

0 Comments