शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट विषयासंदर्भात संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव सोमवारी सकाळी संसदेमध्ये सादर केल्याचे वृत्त टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलं आहे. अर्णब यांचे व्हॉट्सअॅप चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी लीक झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटच्या मुद्द्यावरुन हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून यावरुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी करत सस्पेन्शन ऑफ बिझनेस नोटीस देण्याची मागणी केलीय. हे चॅट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आहे असंही प्रियंका यांनी म्हटलं आहे.
रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संवाद जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या संवादावरून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही संवाद झालेल्याचे दिसून आलं आहे. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे.
हे चॅट समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला असून त्यामध्ये रिपब्लिक चॅनलची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर बार्क चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता यांना अटकही करण्यात आलेली आहे.
0 Comments