‘नावात काय आहे?’ असे शेक्सपिअरने म्हटले असले तरी नाममहात्म्य काही कमी होत नाही. एखाद्या माणसाची ओळख जरी नसली तरी माणसं नावावरून काही अंदाज बांधत असतात. इंडोनेशियातील ‘बांडुंग’ असे नाव असलेले ठिकाण अत्यंत सुंदर असेल असे आपल्याला वाटले नव्हते, असे पु.लं.नी ‘पूर्वरंग’मध्ये म्हटले आहे. अर्थात काही गावांची नावे इतकी विचित्र असतात की, ही नावे कोणी दिली, असाही प्रश्न पडावा. खुद्द त्या गावातील लोकांनाही त्याचे वैषम्य वाटत असते. असेच एक गाव राजस्थानमध्ये आहे. या गावाचे नाव आहे ‘चोरपुरा’
अशा नावामुळे गावातील तरुणांना वधूही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे गावातील लोकांनी हे नाव बदलण्याचे आवाहन सरकारदरबारी केले आहे. खरे तर गेल्या ४० वर्षांपासून गावाचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही तसे घडले नसल्याने समस्या वाढल्याच आहेत. आता गावातील लोकांना ‘गावाचे नाव बदलले नाही तर नाव सांगणार नाही’ अशा थाटाचा पवित्रा घेतला आहे. तेथील आमदार महोदयांनीही एसडीओकडे या विनंतीचा विचार करण्यास सांगितले आहे.
गावाचे नाव ‘चोरपुरा’ आहे ते बदलून ‘सज्जनपुरा’ असे ठेवण्याचाही प्रस्ताव गावकर्यांनी मांडला आहे. गावात सुमारे शंभर कुटुंबे असून बहुतांश लोक शेतकरी व मजूर आहेत. यापैकी बरेचजण कुशवाहा समुदायातील आहेत. त्यांचे म्हणणे आहे की निव्वळ गावाच्या या विचित्र नावाने बाहेरचे लोक आमच्याकडे संशयाने पाहतात. गावाबाहेर सोयरिक करणेही कठीण झाले आहे. अनेकांना गावाबाहेर कामही मिळत नाही, अशी स्थिती आहे.
0 Comments